(दापोली)
पदवीमध्ये प्रामाणिकपणा आणि गुणवत्तेची भर घातली तरच पदवी सार्थ ठरते, असे मत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे राज्यपाल नियुक्त सदस्य प्रा. डॉ. अनिल कुलकर्णी यांनी दापोली येथे व्यक्त केले. वराडकर -बेलोसे महाविद्यालयातील पदवी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र प्रदान कार्यक्रमात ते बोलत होते.
या महाविद्यालयातील बीकॉम- १११, बीए- ३७, बीएससी आयटी- ४, एमकॉम- ५१ आणि एमए- ३ इतक्या विद्यार्थ्यांनी पदवी मिळवली. संस्थेचे सभापती शिवाजी शिगवण म्हणाले, आईने केलेले संस्कार आणि शिकवण यांचा गाभा ठेवून लोक त्यांच्या अभ्यासात प्रगती करत असत. आम्हाला आईची शिकवणच सर्वश्रेष्ठ वाटत असे. संस्थेचे कार्यवाह डॉ. दशरथ भोसले म्हणाले, या महाविद्यालयातील विद्यार्थी देश-विदेशात नोकरी, उद्योग, व्यवसायात कार्यरत आहेत.
संस्थेने केलेल्या ५० वर्षांच्या कार्यामुळेच ते आणि आम्ही इथपर्यंत पोहोचलो आहोत. सर्वांनी याची जाणीव ठेवली पाहिजे. तुम्ही ज्या क्षेत्रात काम करणार आहात त्या क्षेत्रात प्रामाणिकपणे काम करा. या वेळी माजी सभापती जानकीताई बेलोसे यांनी महाविद्यालयाचे नाव उंचावेल, असे काम करण्याचे आवाहन केले.