(चिपळूण)
कार्यकर्त्यांनी सरकारच्या योजनांच्या प्रत्येक लाभार्थ्यांच्या घरापर्यंत स्वतः पोहोचले पाहिजे व भाजपाच्या प्रत्येक वॉरियरनी सहाशे कुटुंबांपर्यंत संपर्क केला पाहिजे. आपला बूथ मजबूत असेल तर प्रत्येक निवडणूक सोपी आहे, असा कानमंत्र सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. रवींद्र चव्हाण यांनी दापोली येथे भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांना दिला. तसेच २२ जानेवारी रोजी होणाऱ्या अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या दिवशी प्रत्येक रामभक्ताने आपापल्या घरी तसेच जवळच्या मंदिरात दिवाळी साजरी करा असे आवाहन केले.
नुकतीच दापोली-जालगाव येथील श्रीशैल सभागृह येथे भारतीय जनता पार्टी उत्तर रत्नागिरी जिल्ह्याची जिल्हा कार्यकारणी बैठक पार पडली. बैठकीला सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. भारतीय जनता पार्टी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने जोरदार कामाला लागली असून त्याच अनुषंगाने ही बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीला जिल्हा पदाधिकारी, विविध मोर्चा व सेलचे अध्यक्ष तसेच मंडळ अध्यक्ष, सरचिटणीस आदींची उपस्थिती होती.
बैठकीचे प्रास्ताविक भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष केदार साठे यांनी केले. तर नमो ॲप बद्दल युवा पदाधिकारी यश मेहता यांनी सविस्तर माहिती उपस्थित पदाधिकाऱ्यांना दिली. यावेळी नमो ॲप स्पर्धेत केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल यश मेहता यांचा सत्कार करण्यात आला.
भाजपा प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी पक्षाच्या संकल्प महाविजय २०२४ या अभियानाबद्दल उपस्थिताना संबोधित केले. कोकण विभाग संघटन मंत्री शैलेंद्र दळवी यांनी बूथ सशक्तीकरण अभियानाबरोबरच अयोध्येतील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठापना दिवशी आपापल्या भागात करावयाच्या कार्यक्रमाबद्दल माहिती कार्यकर्त्यांना दिली. त्यानंतर माजी आमदार डॉ. विनय नातू, रायगड लोकसभा संयोजक धैर्यशील पाटील यांनी संघटनात्मक विषयाबाबत मार्गदर्शन केले. यावेळी मंडणगड, गुहागर, खेड, दापोली येथील विविध पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला.
बैठकीला व्यासपीठावर प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, कोकण संघटन मंत्री शैलेंद्र दळवी, रायगड लोकसभा संयोजक धैर्यशील पाटील,माजी आमदार डॉ.विनय नातू, उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष केदार साठे, महिला मोर्चा प्रदेश सचिव मंजुषा कुद्रिमोती, जिल्हा सरचिटणीस नीलम गोंधळी, विट्ठल भालेकर आदी उपस्थित होते. बैठकीचे सूत्रसंचालन जिल्हा सरचिटणीस श्रीराम इदाते यांनी केले.