(बंगळुरू)
कर्नाटक मंत्रिमंडळाने बुधवारी बीपीएल कार्डधारकांना तांदळाऐवजी रोख रक्कम देण्याचा निर्णय घेतला आहे. १ जुलैपासून ही रक्कम ३४ रुपये प्रति किलो दराने दिली जाणार आहे. तांदळाची व्यवस्था होताच पुन्हा तांदळाचा पुरवठा सुरु करण्यात येणार आहे, तोपर्यंत कर्नाटक सरकार थेट पाच किलो तांदळाच्या बरोबर पैसे हस्तांतरित करणार आहे. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री केएच मुनियप्पा यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली.
मुनियप्पा म्हणाले की, केंद्र सरकारने कर्नाटकला २.३० लाख मेट्रिक टन तांदूळ विकण्यास नकार दिल्यानंतर जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली. केंद्राकडे २६२ लाख टन तांदळाचा पुरेसा साठा आहे. तरीही कर्नाटक सरकार रक्कम देण्यास तयार असतानाही त्यांनी कर्नाटकला तांदूळ दिला नाही. या निर्णयामुळे कर्नाटक सरकारवर मासिक ७०० कोटी रुपयांपेक्षा जास्त रुपयांचा बोझा पडणार आहे.