(मुंबई)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या (बार्टी) वतीने देण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती अंतर्गत ८६१ विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. त्याचवेळी बार्टी, सारथी, टीआरटीआय, महाज्योती या संस्थांच्यावतीने पीएचडीसाठी दिल्या जाणाऱ्या फेलोशीपकरीता एक सर्वंकष समान धोरण तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. यापुढे फेलोशीपसाठी प्रवेश परीक्षा घेण्यात यावी, असा मुद्दाही यावेळी विद्यार्थ्यांनी मांडला.
फेलोशीप मंजूर करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांचे मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन सुरू होते. त्याची दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी बोलावले होते. यावेळी विद्यार्थ्यांच्या मागणीची दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनी पुढील वर्षापासून बार्टी, सारथी, टीआरटीआय, महाज्योती या संस्थांच्यावतीने पीएचडीसाठी दिल्या जाणाऱ्या फेलोशीपकरीता एक सर्वंकष समान धोरण तयार करण्यात यावे, असे निर्देश दिले.
बार्टीकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती (बीएएनआरएफ) ही फेलोशिप दिली जाते. दरवर्षी ठाराविक विद्यार्थ्यांनाच ही शिष्यवृत्ती दिली जाते. मात्र महाज्योती आणि सारथी या संस्थांकडून ओबीसी आणि मराठा समाजातील विद्यार्थ्यांना दिली जाणारी फेलोशिप सरसकट देण्याचा निर्णय घेतला होता. त्यापार्श्वभूमीवर बार्टीनेही सर्व विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप द्यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी लावून धरली होती. त्यासाठी गेल्या ५२ दिवसांपासून विद्यार्थ्यांकडून आझाद मैदानात धरणे आंदोलन सुरु होते. विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला विविध संस्था संघटनांनी पाठिंबा दर्शविला होता.