( मुंबई )
राज्यात सध्या महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा सुरू आहेत. राज्यात २१ फेब्रुवारीपासून बारावीच्या परीक्षेला सुरुवात झाली आहे. त्यातच राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी आंदोलन पुकारले आहे. त्यांनी बारावीच्या परीक्षेतील उत्तरपत्रिका तपासण्यास नकार दिला आहे. त्यामुळे या उत्तरपत्रिकांचे गठ्ठे तसेच पडून असल्याचे चित्र आहे. कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे आंदोलन चिघळल्यास त्याचा थेट परिणाम बारावीच्या निकालावर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आता या परीक्षेचे निकाल रखडणार असल्याची भीती शैक्षणिक वर्तुळात व्यक्त केली जात आहे. मात्र, बोर्डाने निकाल वेळेवर जाहीर होतील, असे म्हटले आहे.
परीक्षा पार पडली की लगेच आदर्श उत्तरपत्रिका तयार करून उत्तरपत्रिका तपासण्यास सुरुवात होते. साधारणपणे मे महिन्याच्या अखेरीस अथवा जून महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात बारावीचा निकाल लागतो. यावर्षी १४ लाख ७५ हजार विद्यार्थी बारावीची परीक्षा देत आहेत. मात्र, आतापर्यंत ज्या विषयांची परीक्षा झाली आहे, त्या विषयांच्या उत्तरपत्रिका तपासण्यास सुरुवात झाली नसल्याची माहिती मिळत आहे. या उत्तरपत्रिका महाविद्यालयात तपासण्यासाठी पोहचल्या आहेत. मात्र, शिक्षकांकडून त्या तपासण्यास नकार देण्यात आल्याचे समजते. काही उत्तरपत्रिका बोर्डाच्या कार्यालयात असून काही पोस्ट ऑफीसमध्येच आहेत. परीक्षा पार पडली की लगेच आदर्श उत्तरपत्रिका तयार करुन उत्तरपत्रिका तपासण्यास सुरुवात होते. मात्र नियामकांची बैठक होत नसल्याने उत्तरपत्रिकांचे पाकिटे पडून आहेत
शिक्षण मंत्र्यांचे आश्वासन
महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघासोबत झालेल्या शिक्षणमंत्र्यांच्या बैठकीत त्यांच्या मागण्यांसंदर्भात योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले होते. मात्र, बैठकीचे इतिवृत्त महासंघाला अजून मिळालेले नाही. त्यांच्या मागण्या प्रलंबित आहेत, त्यामुळे इतिवृत्त मिळाल्यानंतरच महासंघाच्या कार्यकारिणीची बैठक होईल आणि आंदोलनाबाबतचा पुढील निर्णय घेण्यात येईल, असे सांगण्यात येत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक त्यांच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात म्हणून लढताहेत. अनेकदा निवेदन देऊन आंदोलन करून त्यांना सरकारकडून प्रतिसाद न मिळाल्याने शिक्षकांनी पेपर तपासणीवर परीक्षा सुरु होण्याचा काही काळ आधी बहिष्कार टाकला आहे.
आधीच शिक्षकेत्तर कर्मचा-यांचा संप, त्यात शिक्षकांचे आंदोलन
शिक्षकेत्तर कर्मचा-यांनी संप केल्यामुळे परीक्षेच्या आयोजनाचा भार शिक्षकांवर पडला आहे. काही ठिकाणी बारावी प्रात्यक्षिक परीक्षांवर त्याचा परिणाम झाल्याची माहिती आहे. आता बारावीच्या शिक्षकांनी पेपर तपासण्यास नकार दिल्याने बारावी निकाल जाहीर होण्यास उशीर होऊ शकतो. सरकारने जर आमच्या मागण्या मान्य केल्या तर आम्ही उत्तरपत्रिका तपासण्यास लगेच सुरुवात करु असं शिक्षकांनी म्हटले आहे.
निकाल वेळेवर जाहीर होण्याबाबत बोर्डाचे आश्वासन
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी निकाल वेळेवर जाहीर होतील असे स्पष्ट केले आहे. कनिष्ठ महाविद्यालय शिक्षकांनी पेपर तपासण्यावर बहिष्कार टाकला आहे ही बाब खरी असल्याचे त्यांनी म्हटले. बारावी परीक्षा सुरू होण्यापूर्वी कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांनी त्यांच्या दीर्घकाळापासून असलेल्या मागण्या पूर्ण व्हाव्यात म्हणून बहिष्कार टाकला होता. मात्र पुढील एक-दोन दिवसात इतिवृत्त येईल आणि उत्तर पत्रिका तपासणीला सुरुवात होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.