( रत्नागिरी )
रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या बारटक्के इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीतर्फे आयोजित टेकफेस्टच्या शालेय गटातील विजेतेपदाचा चषक सर्वंकश विद्यामंदिरने जिंकला. तर महाविद्यालयीन गटाचा चषक फिनोलेक्स अॅकॅडमी ऑफ मॅनेजमेंट टेक्नॉलॉजीने पटकावला.
रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या बारटक्के इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीतर्फे आयोजित टेकफेस्टचा बक्षीस वितरण कार्यक्रम गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या राधाबाई शेट्ये सभागृहात झाला. या वेळी व्यासपीठावर कार्याध्यक्ष शिल्पा पटवर्धन, उपकार्याध्यक्ष अॅड. विजय साखळकर, कार्यवाह सतीश शेवडे, सहकार्यवाह श्रीकांत दुदगीकर, बारटक्के इन्स्टिट्यूटच्या शाळा समिती अध्यक्ष डॉ. कल्पना मेहता व सदस्य सीए वरद पंडित, आनंद देसाई, मनोज पाटणकर, प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी आणि समन्वयक डॉ. अतुल पित्रे उपस्थित होते.
याप्रसंगी शिल्पाताई पटवर्धन म्हणाल्या की, या संगणक युगामध्ये यशस्वी होण्यासाठी तुमच्या शरीरातील महासंगणक जागरुक करायला हवा, वापरायला हवा. त्याचबरोबर शरीर, मन, आरोग्य, बुद्धी सर्व सजग ठेवायला हवे. संगणक हे दुधारी शस्त्र आहे याचे भान ठेऊन जे कराल ते उत्तम कराल, यश तुमचेच आहे.
डॉ. कल्पना मेहता यांनी आपल्या ओघवत्या शैलीमध्ये उपस्थित विद्यार्थीवृंदाशी संवाद साधत त्यांच्या स्पर्धेतील यशाबद्दल कौतुक केले. यंदा सहभागी न झालेल्या वा जिंकू न शकलेल्या विद्यार्थ्यांनी पुढच्या वर्षी जिद्दीने व जास्त तयारीने यामध्ये उतरण्याचे आवाहन केले. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये विद्यार्थ्यांसाठी सुरू होणाऱ्या नवनवीन कोर्सेसचा देखील त्यांनी उल्लेख केला. सर्व क्षेत्रात आता कृत्रिम बुद्धिमत्ता वापरली जात असून आपणही या क्षेत्रात अभ्यास, संशोधन केले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.
समन्वयक डॉ. अतुल पित्रे यांनी गेल्या वर्षभरात बारटक्के इन्स्टिटयूटने राबवलेल्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला. येत्या नवीन वर्षांपासून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार बारटक्केतर्फे योग्य असे संगणक कौशल्य अभ्यासकक्रम सुरू होत असल्याची माहिती त्यांनी दिली.
या सर्व स्पर्धांकरिता एसएसके इनोव्हेशन, ओमेगो २.०, ईझकॅप एंजल ब्रोकिंग व इतर दानशूर व्यक्तीचे प्रायोजकत्व लाभले. त्यांचा सत्कार यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. सर्व शाळांच्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण केले.
बारटक्के इन्स्टिट्यूटच्या अमित पालकर, रसिका पालकर, अभिजित भाटये, साधना शहाणे, शुभदा जोशी, अमृत कोळवणकर यांनी या टेकफेस्टचे यशस्वी आयोजन केले. गोगटे महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी व डॉ. चित्रा गोस्वामी, प्राध्यापक, मिस्त्री हायस्कूलचे मुख्याध्यापक व अन्य आठ संस्थांचे शिक्षक प्रतिनिधी व स्पर्धक विद्यार्थी खूप मोठ्या संख्येने उपस्थित होता. सूत्रसंचालन मीरा खालगावकर आणि विभागप्रमुख अमित पालकर यांनी केले.
स्पर्धांचा निकाल :
शालेय गट- प्रश्नमंजुषा स्पर्धा- पाचवी ते सातवी- श्रावणी वायंगणकर, इंश्राह काझी, प्रिशा इंदुलकर (तिघी सर्वंकश विद्यामंदिर), आठवी ते दहावी- वरद मयेकर (जीजीपीएस), अन्वय गोगटे व रुद्र पिलणकर (सर्वंकश विद्यामंदिर). महाविद्यालयीन गट- पीपीटी स्पर्धा- सानिका पवार (फिनोलेक्स अॅकॅडमी), अथर्व चव्हाण, प्रसन्न टोप्पो, अफान मस्तान, पद्मनाथ भोळे (गोगटे-जोगळेकर महाविद्यालय), वंश गांधी, सुयोग जोशी (फिनोलेक्स अॅकॅडमी), बग डि कोड स्पर्धा- मोहम्मद हमदुले (फिनोलेक्स अॅकॅडमी), पद्मनाभ भोळे, शुभम मांडवकर (गोगटे कॉलेज), कोड मास्टर स्पर्धा- मोहम्मद हमदुले (फिनोलेक्स अॅकॅडमी), ऋतिक बने (गोगटे कॉलेजः, मिताली डेरे (फिनोलेक्स अॅकॅडमी), वेब डिझायनिंग- सुरभी बापट (महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे बीसीए कॉलेज), सामी वस्ता (फिनेलेक्स अॅकॅडमी), ओंकार वेले (गोगटे कॉलेज), टेक आय टी प्रश्नमंजुषा- सामी वस्ता, मोहम्मद हमदुले (फिनेलेक्स अॅकॅडमी), सईम वाडकर, वृशकेत मुळ्ये (गोगटे कॉलेज), राज पेडणेकर व राज मोहिते (नवनिर्माण कॉलेज)
फोटो : रत्नागिरीत बारटक्के इन्स्टिट्यूटतर्फे आयोजित टेकफेस्ट 2022 चे शालेय गटाचे विजेते सर्वंकश विद्यामंदिर आणि महाविद्यालयीन गटाचे विजेते फिनोलेक्स अॅकॅडमीचे विद्यार्थी. मागे उभे मान्यवर शिल्पाताई पटवर्धन, सतीश शेवडे, डॉ. कल्पना मेहता आणि अन्य.
(छायाचित्र- माऊली फोटो, रत्नागिरी)