(मुंबई)
‘ज्ञानवापी’ बाबत न्यायालयाच्या निकालावर बोलताना ओवैसी म्हणाले की, आम्हाला या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करावी लागेल. मला आशा आहे की, अंजुमन इंतेजामिया मशिद कमिटी या निर्णयाविरोधात याचिका दाखल करेल. या निर्णयानंतर १९९१ च्या धार्मिकपूजा स्थळ कायद्याला काही अर्थ उरत नाही. या निर्णयाने समाजात अस्थिरता वाढेल. आम्ही पुन्हा बाबरीच्या वाटेने जात आहोते. जेव्हा बाबरीबाबत न्यायलयाने निर्णय दिला होता, तेव्हाही मी इशारा दिला होता की, आम्हाला हे अचडणीचे ठरू शकते. जेव्हा बाबरी मशिदीबाबत निकाल देण्यात आला होता, तेव्हा मी सर्वांना इशारा दिला होता की, यामुळे देशात समस्या निर्माण होतील, कारण हा निकाल केवळ श्रद्धेच्या आधारावर देण्यात आला होता.
ज्ञानवापी मशिद प्रकरणात वाराणसी जिल्हा सत्र न्यायालयाने मोठा निर्णय सुनावला आहे. न्यायालयाने म्हटले की, ही केस सुनावणी योग्य आहे. जिल्हा न्यायालयाकडून ज्ञानवापी-शृंगार गौरी प्रकरणाच्या सुनावणीचा मार्ग मोकळा झाला आहे. न्यायालयाने अंजुमन इंतजामिया मशिद कमिटीची याचिका फेटाळून लावली आहे. हिंदू याचिकाकर्ते हा आपला विजय मानत आहेत. या निकालावर एमआयएम पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी म्हटले आहे की, न्यायालयाच्या या निर्णयानंतर असे वाटते की, आम्ही बाबरी मशिदीच्या मार्गाने चाललो आहोत.