(रत्नागिरी / विशेष प्रतिनिधी)
रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालय विविध गैरसोयींबाबत नेहमी चर्चेत असते. अशातच रुग्णालयाची लिफ्ट सुविधा बंद पडली होती. रूग्णालयाची लिफ्ट सुविधा बंद असल्याने, याचा त्रास रुग्णांना होत असल्याचे दिसून आले होते जिल्हा रुग्णालय प्रशासनाने लिफ्ट तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी देखील रुग्णांच्या नातेवाईकांकडून करण्यात येत होती. याबाबत एका वृत्तपत्रासह रत्नागिरी 24 न्यूज ला बुधवारी (दिनांक १२ जुलै २०२३) बातमी प्रसिध्द करण्यात आली होती. या बातमीची दखल घेऊन प्रशासनाकडून तातडीने लिफ्टचे काम हाती घेऊन ते पूर्ण देखील करण्यात आले आहे.
रत्नागिरी येथील जिल्हा रुग्णालयाची इमारत तीन मजली आहे. वरच्या मजल्यावरून चढ-उतार काढण्यासाठी या ठिकाणी लिफ्ट बसविण्यात आलेली आहे. लिफ्टच्या माध्यमातून रुग्णांना सुलभपणे हलविण्यात येते. मात्र रुग्णालयाच्या इमारतीमधील लिफ्टची सुविधा दहा ते बारा दिवस बंद ठेवण्यात आली होती. तशी सूचना देखील भिंतीवर लावण्यात आली होती. लिफ्ट बंद असल्याने त्याचा नाहक त्रास अतिगंभीर रुग्णांना सहन करावा लागत असल्याचे दिसून आले होते. या लिफ्टचा वापर रुग्णांना सर्जरी वॉर्ड, पुरुष, महिला वॉर्डमध्ये स्ट्रेचरवरून ने- आण करण्यासाठी होतो. गेले काही दिवस लिफ्ट बंदचा नाहक त्रास रुग्णांना सहन करावा लागला. आता मात्र प्रशासनाने तातडीने लिफ्ट सुरू करण्याचा निर्णय घेतल्याचे दिसून येते. १२ जुलै रोजी रत्नागिरी 24 न्यूजवर बातमी प्रसिध्द होताच आरोग्य विभागाला जाग आली असून दुसऱ्याच दिवशी १३ जुलै २०२३ रोजी सकाळीच लिफ्टचे काम सुरू करण्यात आले. ते काम त्याचं दिवशी पूर्ण करत लिफ्ट सुविधा सुरळीत चालू केली आहे.
लिफ्टची काळजी घेणे आवश्यक
रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी लिफ्टचा वापर योग्यरित्या करणे गरजेचे आहे. लिफ्टचा सेन्सॉर तुटला असल्याने लिफ्ट बंद ठेवण्यात आली होती असे लिफ्ट मेंटेनस कंपनीचे टेकनीशियन यांनी सांगितले आहे. तसेच रुग्णालयातील कर्मचारी स्ट्रेचरवरून रुग्णाला घेऊन जाताना स्ट्रेचर लिफ्टच्या सेन्सॉरला आदळत असतो. तरीही लक्ष दिलें जात नसल्याचे निदर्शास आले आहे. रुग्णालयाच्या परिसरात गुटखा, तंबाखू खावून लिफ्टमध्येच थुंकलेले दिसून येते. एकूणच आरोग्य कर्मचारीवर्गाकडून लिफ्टची कोणतीही काळजी घेतली जात नाही. यामुळे लिफ्ट बंद पडण्याचे प्रकार घडत असतात. त्यामुळे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी लिफ्ट व्यवस्थितरीत्या हाताळणे आवश्यक आहे.