आंबा बाग, नारळी पोफळी, फळबागाचे नुकसान करणाऱ्या माकडांना, वानराना हुसकावून लावण्यासाठी देवगड येथील एका शेतकऱ्याने नामी शक्कल शोधून काढली आहे. यामुळे माकडही सुरक्षित राहतील आणि शेतकऱ्याचे नुकसानही होणार नाही.
देवगड येथील प्रसाद मोंडकर यांनी हा प्रयोग केला आहे. ते म्हणतात, पॉपकॉर्नमध्ये लाल तिखट पावडर आणि थोडे मीठ मिसळायचे, आणि १०० ग्रॅमच्या पिशव्या तयार करून त्यामध्ये जागोजागी झाडांच्या फांद्यांना या पिशव्या लावून ठेवायच्या. बागेत माकड, वानर आले की त्या पिशव्या पळवतात आणि लांब जाऊन पॉपकॉर्न खातात. पॉपकॉर्न खाल्ल्यानंतर किंवा खाताना ते अंगाला आणि डोळ्यांना हात लावतात, डोळे चोळतात. त्यामुळे पॉपकॉर्न पिशव्यांमधील तिखट डोळ्यामध्ये गेल्यामुळे माकडांना आंबाबागेची भिती वाटते. या ठिकाणी आपल्याला त्रास होऊ शकतो. यामुळे माकडे बागेकडे पुन्हा फिरकत नाहीत. हा त्यांचा प्रयोग यशस्वी ही झाला आहे.
ते म्हणतात की, कोकणातल्या आंबा, नारळ, सुपारी बागायतदार पॉपकॉर्न ऐवजी चुरमुरे किंवा लाह्या वापरून असा प्रयोग करु केल्यास फायदेशीर ठरू शकतो. माकडांपासून आपल्या बागेचं रक्षण करण्यासाठी तुलनेने सोपा आणि स्वस्त उपाय आहे ज्यामध्ये माकडाला ठार मारण्याची गरज नाही, असे ते म्हणतात.