(मुंबई)
विश्वचषक २०२३ च्या २३ व्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने बांगलादेशला ३८३ धावांचे लक्ष्य दिले. मात्र बांगलादेशला सदर आव्हान पेलताना चांगलीच दमछाक झाली. याचा परिणाम बांगलादेशाने ४६.४ षटकांत केवळ २३३ धावा काढत पराभव पत्करला तर द. आफ्रिकेने १४९ धावांच्या मोठा फरकाने सामना जिंकला. या विजयासह आफ्रिकेचा संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर पोहोचला असून उपांत्य फेरीतील आपला दावा मजबूत केला आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत 382 धावा केल्या. प्रत्युत्तरात बांगलादेशला केवळ 233 धावा करता आल्या आणि 149 धावांनी सामना गमावला.
या स्पर्धेतील दक्षिण आफ्रिकेचा हा चौथा विजय आहे. या सामन्यातील विजयासह आफ्रिकेचा संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आला आहे. दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 5 गडी गमावून 382 धावा केल्या. प्रत्युत्तरात बांगलादेशचा संघ 46.4 षटकात केवळ 233 धावा करू शकला. बांगलादेश संघाकडून फलंदाजीत केवळ महमुदुल्लाह दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांसमोर उभा राहू शकला आणि त्याने 111धावांची शानदार खेळी केली. मात्र त्याची खेळी संघाला उपयोगी पडू शकली नाही.
ICC Men's Cricket World Cup 2023
Bangladesh 🆚 South Africa 🏏South Africa Won by 149 Runs
Photo Credit: ICC/Getty#BCB | #SAvBAN | #CWC23 pic.twitter.com/bfAS63pNoQ
— Bangladesh Cricket (@BCBtigers) October 24, 2023
383 धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशचा संघ कधीही लयीत दिसला नाही. तनजीद हसन आणि लिटन दास यांची सुरुवात संथ झाली. या जोडीने सहा षटकांत 30धावा जोडल्या आणि या धावसंख्येवर तनजीद हसन बाद झाला. पुढच्याच चेंडूवर नजमुल हसनही बाद झाला. कर्णधार शाकिब एक धावा करून बाद झाला तर मुशफिकर रहीम आठ धावा करून बाद झाला. लिटन दासही 44 चेंडूत 22 धावा करून बाद झाला. बांगलादेशने 81 धावांत सहा विकेट गमावल्या होत्या.
महमुदुल्लाहने एक बाजू लावून धरलीआणि मेहदी हसन-नसुमने त्याला साथ देत महत्त्वपूर्ण 19 धावा केल्या. हसन महमूदने 15 आणि मुश्तफिझूरने 11 धावा केल्या. दरम्यान, महमुदुल्लाने वेगाने धावा काढत आपले शतक पूर्ण केले. तो 111 धावांवर बाद झाला. यावेळी बांगलादेशची धावसंख्या 9 बाद 227 होती. यानंतर संपूर्ण संघ 233 धावांवर गारद झाला. दक्षिण आफ्रिकेकडून गोलंदाजीत गेराल्ड कोटझेने तीन बळी घेतले. मार्को यानसेन, कागिसो रबाडा आणि लिझार्ड विल्यम्स यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. केशव महाराजने एक विकेट घेतली.
तत्पूर्वी, दक्षिण आफ्रिकेनं निर्धारीत 50 षटकात 5 बाद 382 धावा केल्या. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या आफ्रिकन संघाची सुरुवात खराब झाली. रीझ हेंड्रिक्स 12 धावा करून बाद झाला तर रॅसी व्हॅन डर डुसेन एक धावा काढून बाद झाला. हेंड्रिक्सला शोरीफुल यानं आणि डूसेन याला मिराजने बाद केले. यानंतर क्विंटन डी कॉकने कर्णधार एडन मार्करामसोबत तिसऱ्या विकेटसाठी 131 धावांची भागीदारी केली.
डी कॉकने त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील 20 वे शतक आणि या विश्वचषक 2023 स्पर्धेतील तिसरे शतक झळकावले. त्याचवेळी, मार्करामने आपल्या वनडे कारकिर्दीतील नववे अर्धशतक झळकावले. ही भागीदारी साकिबने तोडली. मार्कराम 69 चेंडूंत सात चौकारांच्या मदतीने 60 धावा करून बाद झाला. त्याचवेळी, आपल्या 150 व्या एकदिवसीय सामन्यात, डी कॉकने 140 चेंडूत 15 चौकार आणि सात षटकारांच्या मदतीने 174 धावांची खेळी केली. या विश्वचषकातील ही सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे. यापूर्वी हा विक्रम डेव्हिड वॉर्नरच्या नावावर होता. त्याने पाकिस्तानविरुद्ध 163 धावांची इनिंग खेळली होती. यानंतर हेनरिक क्लासेनने 34 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले.
क्लासेन आणि डी कॉकमध्ये 141 धावांची भागीदारी झाली. क्लासेनने 49 चेंडूंत दोन चौकार आणि आठ षटकारांच्या मदतीने 90 धावांची खेळी केली. डेव्हिड मिलरन 15 चेंडूत एक चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने 34 धावा केल्यानंतर नाबाद राहिला. तर मार्को जॅनसेन एक धाव घेत नाबाद राहिला. बांगलादेशकडून हसन महमूदने 2 तर मेहदी हसन मिराज, शोरीफुल इस्लाम, शाकिब अल हसन यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.
पॉईंट्स टेबलमध्ये उलटफेर
दक्षिण आफ्रिकेच्या या विजयासोबतच पॉईंट्स टेबलमध्येही बदल झाले आहेत. तिसऱ्या क्रमांकावरून दक्षिण आफ्रिका दुसऱ्या क्रमांकावर आली आहे, तर न्यूझीलंड तिसऱ्या क्रमांकावर गेली आहे. दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडने 5 पैकी 4 मॅच जिंकल्या आहेत, पण दक्षिण आफ्रिकेचा नेट रनरेट जास्त असल्यामुळे ते न्यूझीलंडपेक्षा पुढे आहेत. तर 5 मॅचमध्ये 5 विजय मिळवत टीम इंडिया पहिल्या क्रमांकावर आहे. 4 सामन्यांमध्ये 2 विजय आणि 2 पराभवासह ऑस्ट्रेलिया चौथ्या क्रमांकावर, 2 विजय आणि 3 पराभवांसह पाकिस्तान पाचव्या क्रमांकावर आहे. तर अफगाणिस्ताननेही 5 पैकी 2 मॅच जिंकल्या आहेत, पण खराब नेट रनरेटमुळे ते सहाव्या क्रमांकावर आहेत. या यादीत नेदरलँड्स सातव्या, श्रीलंका आठव्या, इंग्लंड नवव्या आणि बांगलादेश दहाव्या क्रमांकावर आहे. या चारही टीमना आतापर्यंत फक्त एकच मॅच जिंकता आली आहे.