(नवी दिल्ली)
बनावट आधार कार्ड वापरणाऱ्यांविरुद्ध सरकारने आता ठोस कारवाई सुरु केली आहे. एखाद्या व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी प्रत्यक्ष किंवा इलेक्ट्रॉनिक स्वरूपात आधारकार्ड स्वीकारण्यापूर्वी किंवा मान्य करण्यापूर्वी व्हेरिफिकेशन (पडताळणी) करणे गरजेचे आहे, असे आयटी मंत्रालयाने सांगितले आहे. आधार कार्ड संदर्भात गुरुवारी यूआयडीएआयने नियमावली जारी केली. यामध्ये आधार कार्ड स्वीकारण्यापूर्वी संस्थांनी पडताळणी करणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे. यामुळे बनावट आधार कार्डला लगाम बसण्यास मदत होणार आहे.
यूआयडीएआयने जारी केलेल्या नियमावलीत आधार कार्ड जमा केल्यानंतर त्या व्यक्तीच्या संमतीनंतर आधार क्रमांकाची पडताळणी करावी. एखाद्या व्यक्तीने सादर केलेल्या कोणत्याही प्रकारच्या आधारचा (आधार कार्ड, ई-आधार, आधार पीव्हीसी कार्ड आणि एम-आधार) खरेपणा तपासण्यासाठी यंत्रणा वापरली जाणार आहे. त्यासाठी आधार अॅप आणि आधार क्यूआर कोड स्कॅनर वापरून सर्व प्रकारच्या आधारची पडताळणी केली जाऊ शकते. क्यूआर कोड स्कॅनर अँड्रॉईड आणि आयओएस आधारित मोबाइल फोनवरील अॅप्लिकेशनसाठी विनामूल्य आहे.
आधार कार्डची पडताळणी केल्यामुळे अप्रामाणिक आणि असामाजिक घटक कोणत्याही संभाव्य गैरवापरात सहभागी होण्याला आळा बसण्यास मदत होणार आहे. कोणताही १२ अंकी क्रमांक आधार नाही, या यूआयडीएआयच्या भूमिकेचे समर्थन करते. आधार दस्तावेजांची छेडछाड झाली असल्यास ऑफलाइन पडताळणीद्वारे त्याचा शोध घेता येऊ शकतो. बनावट आधार कार्ड तयार करणे अथवा आधारशी छेडछाड करणे हा गुन्हा आहे. आधार कायद्याच्या कलम ३५ अंतर्गत तो व्यक्ती दंडास पात्र आहे, असे आयटी मंत्रालयाने म्हटले आहे
यूआयडीएआयचे राज्यांना निर्देश
यूआयडीएआयने वापरापूर्वी आधार पडताळणीच्या आवश्यकतेवर भर देण्याची राज्य सरकारांना सूचना केली आहे. याबाबत राज्यांना आवश्यक निर्देश देण्याचे आवाहन केले आहे. जेणेकरून जेव्हा ओळखपत्राचा पुरावा म्हणून आधार कार्ड सादर केले जाईल, तेव्हा आधार वापरून संबंधित संस्थेद्वारे रहिवाशाचे प्रमाणीकरण/पडताळणी केली जाईल, असे यूआयडीएआयने म्हटले आहे.
प्रोटोकॉलचे पालन आवश्यक
यूआयडीएआयने संस्थाना प्रमाणीकरण/पडताळणीसाठी विनंती केली असून तसे अधिकार देणारी परिपत्रकेदेखील जारी केली आहेत. ज्यात पडताळणीच्या आवश्यकतेवर भर आणि प्रोटोकॉलचे पालन करण्यास सांगितले आहे.
ओळख पटविण्यासाठी आधार क्रमांकाचा वापर
रहिवासी स्वेच्छेने त्यांचे आधार कागद किंवा इलेक्ट्रॉनिक स्वरूपात सादर करून त्यांची ओळख पटवण्यासाठी आधार क्रमांक वापरू शकतात. यूआयडीएआयने यापूर्वीच रहिवाशांसाठी काय करावे आणि काय करू नये, याबद्दल माहिती प्रसिद्ध केली असून रहिवासी आत्मविश्वासाने त्यांचे आधार वापरू शकतात, असेही यूआयडीएआयने म्हटले आहे.