हिंदू धर्मामध्ये चारधाम यात्रेला अनन्य साधारण महत्त्व आहे. स्कंद पुराणातही या यात्रेचे महत्त्व सांगण्यात आले आहे. चारधामच्या दर्शनाने सर्व प्रकारची पापे नष्ट होतात असा उल्लेख ग्रंथांमध्ये केलेला आहे. प्राचीन काळापासून या चारधाम यात्रेला जाणा-या भाविकांची संख्या मोठी आहे. ही चारधाम यात्रा एप्रिल महिन्यात सुरु होत असून यात्रेच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.
गेल्यावर्षी चारधामयात्रेसाठी लाखाहून अधिक भाविक आले होते. भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून उत्तराखंड सरकार विविध योजना राबविण्याच्या प्रयत्नात आहे. त्यासाठी ऑनलाईन बुकींगही सुरु करण्यात येणार आहे. भाविकांनी यात्रेसाठी बुकींग केल्यावर त्यांना ठराविक वेळ देण्यात येणार असून त्याचवेळेत भाविकांना दर्शन घेता येणार आहे, यामुळे या धार्मिक स्थळांवर होणारी भाविकांची जास्त गर्दी कमी करण्याचा प्रयत्न सरकारचा असणार आहे.
चारधाम यात्रा ही हिंदू भाविकांमध्ये अत्यंत श्रद्धेची यात्रा मानली जाते. चारधाम केल्यानं जन्मेजन्मीचं पुण्य पदरी पडतं असं श्रद्धाळू मानतात. गेल्या वर्षी जोशीमठ इथं घरांना, दुकानांना मोठ्या प्रमाणावर तडे गेले होते. जोशीमठ हे चारधाम यात्रेचा एंट्री पॉइंट असल्याने आता ही यात्रा करता येईल की नाही याबाबत भाविकांमध्ये भीतीचं वातावरण होतं. मात्र बद्रीनाथ-केदारनाथ समितीने एक आनंंदाची बातमी दिली आहे.
या दिवशी उघडणार बद्रीनाथ-केदारनाथचे दरवाजे
समितीने यंदाची बद्रीनाथ आणि केदारनाथ यात्रेची तारीख जाहीर केली आहे. मंदिर समितीने दिलेल्या माहितीनुसार केदारनाथ धामचे दरवाजे २६ एप्रिलला आणि गंगोत्री-यमुनोत्रीचे दरवाजे २२ एप्रिलला उघडतील. यापूर्वी २७ एप्रिल रोजी श्री बद्रीनाथ धामचे दरवाजे उघडण्याची तारीख निश्चित करण्यात आली होती. 22 एप्रिल अक्षय्य तृतीयेला, कृतिका नक्षत्रात 12.41 मिनिटांनी अभिजित मुहूर्तावर यमुनोत्री धामचे दरवाजे उघडल्यावर हजारो भाविक येथे दाखल होतील अशी शक्यता आहे.
22 एप्रिल रोजीच आई यमुनेची उत्सव डोली तिच्या मातृगृह म्हणजे खुशीमठ, खरसाळी येथून सकाळी 8.25 वाजता बंधू शनिदेव आणि सोमेश्वर महादेव यांच्या नेतृत्वाखाली यमुनोत्री धामसाठी निघणार आहे. याआधी 21 रोजी माँ गंगेच्या भोग मूर्तीचे गंगोत्रीकडे प्रस्थान होणार आहे. या तारखा जाहीर झाल्यावर उत्तराखंडमध्ये चारधाम यात्रेच्या तयारीला वेग आला आहे. बद्रीनाथ धामचे दरवाजे उघडण्याच्या अवघ्या १५ दिवस आधी गडू घडा तेल कलश यात्रा काढण्यात येणार आहे, ज्याची तारीख १२ एप्रिल २०२३ निश्चित करण्यात आली आहे
बद्रीनाथ धाम हे तीर्थक्षेत्र भगवान विष्णूंना, बद्रीनाथच्या रूपात समर्पित आहे. बद्रीनाथ अलकनंदा नदीच्या काठावर वसलेले आहे. त्याची स्थापना भगवान श्री राम यांनी केली असे मानले जाते. या मंदिरात नर-नारायणाची पूजा केली जाते आणि अखंड दीप प्रज्वलित केला जातो. बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे उघडल्यावर सुमारे 6 महिने पूजा केल्यानंतर नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात दरवाजे पुन्हा बंद केले जातात.
चारधाम यात्रा अत्यंत कठीण असली तरी भाविक मोठ्या संख्येनं ही यात्रा करण्यासाठी उत्तराखंडमध्ये दाखल होतात. यावर्षीही ही संख्या मोठी असणार आहे. मात्र जोशी मठ येथील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर या यात्रा नियोजनाचे आव्हान सरकारसमोर असणार आहे.