( संगमेश्वर / प्रतिनिधी )
दर काही वर्षांनी बदलणारा अभ्यासक्रम, त्यातील अध्यापनाचा महत्त्वाचा भारांश, ज्ञान रचनावादी शिक्षण, बदललेली परीक्षा पद्धती, म्हणजे सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन! या मूल्यमापनाचा खरा हेतू समजावून घेऊन आकारिक व संकलित गोष्टीतून वस्तुनिष्ठ सृजनशीलता घडून यावी, व अशा सृजनशीलतेसाठीच प्रत्येक केंद्रातून शिक्षण परिषदेचे विविध विषयांवर आधारित आयोजन करण्यात येते, या मूल्यमापनाबाबतची वस्तुनिष्ठ कागदपत्रे व रेकॉर्ड कसे ठेवावे? यावर आधारित सखोल अभ्यासपूर्ण मार्गदर्शन कडवई प्रभागाचे शिक्षण विस्तार अधिकारी माननीय विनायक पाध्ये यांनी तुरळ केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेमध्ये शाळा गोळवलीटप्पा येथे केले. शिक्षण परिषद केंद्रप्रमुख जयंत शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.
प्रथम सत्रात शिष्यवृत्ती मार्गदर्शन, सौ. प्रतीक्षा खेडेकर व श्रीमती सीमा कुमटकर यांनी इंग्रजी, बुद्धिमत्ता, मराठी या विषयातील उदाहरणांचे दाखले, क्लुप्त्या, व्याकरणातील बारकावे, विद्यार्थ्यांना कठीणातून सोपे कसे शिकवता येईल, रंजकता कशी निर्माण होईल , सराव कसा घ्यावा? इत्यादी गोष्टी स्पष्टीकरणाने प्रात्यक्षिक रित्या समजावून दिल्या.
केंद्रप्रमुख जयंत शिंदे यांनी प्रशासकीय कामाची उत्तम प्रकारे माहिती देऊन सर्वांनी आपली कामे वेळेत पूर्ण करून कार्यालयाला प्रशासकीय कामात सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन केले. शिक्षण परिषदेसाठी केलेल्या उत्तम नियोजनाबद्दल उपस्थित सर्वांनी मुख्याध्यापिका सौ. श्वेता खातू यांना धन्यवाद दिले. यावेळी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ. अर्चना किंजळकर व ग्रा. पं. सदस्या सौ. अंकिता चरकरी , नितीन थोराडे , रविंद्र गमरे आदि मान्यवर उपस्थित होते.