(चिपळूण)
ज्यावेळी विधानसभेत मी मुंबई- गोवा महामार्गावर सातत्याने होणाऱ्या गोवंश हत्येविरोधात आवाज उठविला, गोवंश हत्येचा मुद्दा मांडला, तेव्हापासून काहींच्या पोटात दुखू लागले आणि ते पिसाळले आहेत. लोटेतील गोशाळेचा मला कसलाच त्रास नाही. मग मी त्या विरोधात का जाऊ? मात्र यामागे बोलविता धनी वेगळाच आहे, असे आ. भास्कर जाधव यांनी सांगून वारंवार बदनामी करणाऱ्यांविरोधात आपण कोर्टात जाणार असल्याचे शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत जाहीर केले. शहरातील पाग येथील शिवसेना संपर्क कार्यालयात शिवसेना नेते आ. भास्कर जाधव यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी फैसल कासकर व अन्य मान्यवर उपस्थित होते.
यावेळी आ. जाधव म्हणाले की, भगवान कोकरे नामक व्यक्ती सातत्याने आपल्यावर माध्यमांतून आरोप करीत आहे. लोटेतील संत ज्ञानेश्वर माऊली मुक्तीधाम गोशाळेला आपला विरोध आहे, असे सांगून आपल्या विरोधात निराधार आरोप केले जात आहेत आणि हे आरोप माध्यमांमधून दाखविले जात आहेत. माध्यमांनी त्यांच्याकडे पुरावे का मागितले नाहीत? आणि पुरावे असतील तर त्यांनी अजूनही प्रसिद्ध करावेत.
चाळीस वर्षे राजकारणात असणाऱ्या व्यक्तीविरोधात असे आरोप होत असतील तर त्या बाबत शहानिशा करणे जरूरीचे आहे. त्यामुळे आपल्या बदनामीविरोधात बदनामी करणाऱ्यांना न्यायालयात खेचणार आहोत, असे त्यांनी सांगितले. या आरोपांमुळे सातत्याने मानहानी झाली आहे. आता कायदेशीर कारवाई करणार आहे. भगवान कोकरेना गोशाळेसाठी एक कोटीचे अनुदान देण्यासाठी आपणच प्रयत्न केले असेही त्यांनी स्पष्ट केले.