(बेळगाव)
बजरंग दल ही राष्ट्रभक्त संघटना आहे. अशा संघटनेवर बंदी घालण्याची मागणी करणे म्हणजे एकप्रकारे देशद्रोह्यांनाच साथ देण्यासारखे आहे, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. बेळगावात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना फडणवीसांनी हे वक्तव्य केले.
बेळगावातील प्रचार सभांमध्ये बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कर्नाटकात काँग्रेसचे सरकार आल्यावर बजरंग दलासारख्या राष्ट्रभक्त संघटनेवर बंदी घालण्याची भाषा केली जात आहे, परंतु बजरंग दलावर बंदी घालण्याची कुणाच्या बापाची हिंमत नाही. रामाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्यांना त्यांची जागा दाखविण्याची हीच वेळ आहे. भारतमाता आमची संस्कृती, तर प्रभू श्रीराम आमची अस्मिता आहे. त्यावर कुणी प्रश्नचिन्ह निर्माण करीत असेल तर त्यांना त्यांची जागा दाखविण्याची हीच खरी वेळ आहे, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
कर्नाटकात काँग्रेसचे सरकारच येणार नाही. तरीही काँग्रेस नेते मुख्यमंत्रीपदासाठी भांडत आहेत. बेळगावात आणि कर्नाटकातही कमळच फुललेले दिसेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात ९ वर्षांत मोठे परिवर्तन झाले आहे. गरिबांसाठी केंद्रातून जाणारा प्रत्येक पैसा गरिबांच्या खात्यात जात आहे. भारताला जगातील पाचव्या क्रमाकांची अर्थव्यवस्था बनविण्याचे काम मोदींनी केल्याचे फडणवीस म्हणाले.