(नवी दिल्ली)
इन्कम टॅक्स रिटर्न अर्थात आयकर विवरण भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. आयकर रिटर्न भरण्याची अंतिम तारीख ३१ जुलै २०२३ निश्चित करण्यात आली आहे. आयकर विवरणपत्र भरताना अनेक प्रकारची कागदपत्रेही आवश्यक असतात. फॉर्म १६ हे देखील या महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक आहे. प्रत्येक पगारदार व्यक्तीला आयकर रिटर्न भरण्यासाठी फॉर्म १६ आवश्यक आहे. आयकर विभागाने केलेल्या नियमांनुसार प्रत्येक कार्यालयाने आपल्या टीडीएस उत्पन्न कर्मचा-यांसाठी फॉर्म १६ जारी करणे बंधनकारक आहे.
तथापि, फॉर्म १६ जारी केला नसेल आणि पगारदार व्यक्तींच्या श्रेणीत येत असाल तर फॉर्म १६ शिवाय आयकर रिटर्न भरता येऊ शकणार आहे. बऱ्याच बाबतीत लोक फॉर्म १६ शिवाय देखील आयकर रिटर्न भरू शकतात. फॉर्म १६ असा एक दस्तऐवज आहे ज्याद्वारे कर्मचाऱ्याच्या संपूर्ण करपात्र उत्पन्नाचा हिशेब मिळू शकतो. काही कर्मचाऱ्यांचे वेतन करपात्र उत्पन्नात येत नसल्याचे अनेकदा दिसून आले आहे. अशा स्थितीत कंपनी त्यांच्यासाठी फॉर्म १६ जारी करत नाही. असे असल्यास तुम्ही फॉर्म १६ शिवाय देखील ITR भरू शकता.
तज्ज्ञांच्या मते, पगारदार व्यक्ती फॉर्म १६ शिवाय आयटीआर दाखल करू शकतात. यासाठी त्यांना पेमेंट/सॅलरी स्लिप आणि फॉर्म २६ एएससारख्या कागदपत्रांची आवश्यकता आहे. तसेच यासाठी तुम्हाला काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. फॉर्म १६ शिवाय आयटीआर फाइल करण्यासाठी एखाद्याने संबंधित आर्थिक वर्षाशी संबंधित सर्व पगाराच्या स्लिप एकत्र केल्या पाहिजेत. या स्लिप्समध्ये पगार, भत्ते, कपाती आणि इतर कपातीचा तपशील असावा. याशिवाय पगार स्लिप, भत्ता आणि बोनस यांचा समावेश करून उत्पन्न मोजावे.
फॉर्म १६ शिवाय आयटीआर दाखल करण्यासाठी करदात्यांनी व्याज, लाभांश आणि इतर स्त्रोतांकडून मिळणारे उत्पन्न यांसारख्या वेतनाव्यतिरिक्त इतर स्त्रोतांकडून मिळणारे उत्पन्न मोजायला हवेत. ही सगळी रक्कम करपात्र उत्पन्नात समाविष्ट केल्या पाहिजेत. याशिवाय, फॉर्म २६ एएस व्हेरिफाय करणेदेखील महत्त्वाचे आहे. फॉर्म २६ एआय तुमच्या पॅन कार्डवर कापलेल्या सर्व करांचा तपशील देतो. याशिवाय फॉर्म २६ एआयमध्ये नमूद केलेला टीडीएस तपशील आणि आयकरातील उत्पन्नाच्या तपशीलाशी जुळते का, हे पाहणेदेखील महत्त्वाचे आहे. या तपशीलात काही फरक असल्यास तुम्हाला तुमच्या कार्यालयात किंवा बँकेशी संपर्क साधावा लागेल. तसेच ते दाखल केल्यानंतर तुम्हाला व्हेरिफाय करावे लागेल. व्हेरिफाय केल्याशिवाय तुमची आयटीआर फाइलिंग अपूर्ण मानली जाईल.
फॉर्म १६ म्हणजे काय?
पगारदार वर्गासाठी आयकर रिटर्न भरताना फॉर्म १६ अत्यंत महत्त्वाचा दस्तऐवज आहे. यामध्ये तुमच्या एकूण उत्पन्नाचा हिशोब दिलेला असतो. यावरून एखाद्या व्यक्तीने एकूण किती पैसे खर्च केले हे समजते. गेल्या आर्थिक वर्षात किती कर कापला गेला आणि TDSची माहितीही उपलब्ध असते, ज्यामध्ये तुमच्या गुंतवणुकीची माहितीही नोंदवली जाते. तुमच्या सॅलरी स्लिपनंतर हे दुसर महत्त्वाचे कागदपत्र आहे.