(खेड/इक्बाल जमादार)
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटात चिपळूणहून डोंबिवलीच्या दिशेने जाणाऱ्या कार चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने कार २५-३० फूट खोल दरीत कोसळली. मात्र ‘फुल और कांटे’ सिनेमा स्टाईल गाडी अडकल्याने प्रवासी बालबाल बचावले. दगडावर अडकलेल्या गाडीतून एक एक प्रवासी काळोखातून गाडीच्या बाहेर पडताना व्हिडीओमध्ये दिसत आहेत. हा अपघात सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास घडला.
सविस्तर माहिती अशी की, कार चालक स्वप्निल सुधीर जाधव (34 रा. डोंबिवली) याचा आपल्या ताब्यातील कारवरचा ताबा सुटल्याने कार 25 ते 30 फुट खोल दरीत कोसळून अपघात झाला. यामध्ये कार चालक सुदैवाने बचावला. अपघात घडल्याची माहीती मिळताच मृत्यूंजय देवदुत समीर मोरे, महेश रांगोळी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बोंडकर, बोरकर, पोलीस हवालदार रामाकडे, पोलीस नाईक मादळकर आदी अपघातस्थळी दाखल झाले. त्यांनी अपघातातील कार चालकाला बाहेर काढण्यास मदत केली. ‘काळ आला होता पण वेळ आली नव्हती’ या म्हणीचा प्रत्यय येथे दिसून आला.