( क्रीडा )
जगभरातील देशांत फुटबॉल चांगलाच परिचित आहे आणि फुटबॉल स्टार म्हणून मेस्सीला ओळखले जाते. जागतिक फुटबॉलमधील अव्वल दर्जाचा खेळाडू आणि अर्जेंटिना संघाचा कर्णधार मेस्सीचा खेळ म्हणजे मंत्रमुग्ध करणार असाच असतो. पण हाच मेस्सी लवकरच निवृत्त होणार आहे. त्याने स्वत:च यंदाचा कतारमध्ये होणारा फिफा विश्वचषक २०२२ हा त्याचा अखेरचा विश्वचषक असणार हे जाहीर केले आहे.
३५ वर्षीय मेस्सीने आजवर अनेक रेकॉर्ड आपल्या नावावर केले आहेत. आजही कोणत्याही खेळाडूला लाजवेल, असा खेळ मेस्सीचा आहे. पण आता लवकरच तो निवृत्ती घेणार आहे. मात्र इतक्या अप्रतिम खेळीनंतरही मेस्सीला आजवर आपल्या देशाला अर्जेंटिनाला विश्वचषक जिंकवून देण्याची त्याची इच्छा अपूर्ण आहे. आता यंदाचा विश्वचषक त्याचा अखेरचा असेल हे त्याने स्वत: सांगतिले असून तो म्हणाला, हा नक्कीच माझा शेवटचा विश्वचषक आहे. मला शारीरिकदृष्ट्या चांगले वाटत आहे, मी या वर्षी प्री-सीझनमध्ये खूप चांगली कामगिरी करू शकलो, जे मी गेल्या वर्षी करू शकलो नाही. मी जिथे आहे तिथे पोहोचणे आवश्यक होते ते देखील चांगल्या मनस्थितीने. पण यंदाचा विश्वचषक माझा अखेरचा विश्वचषक असेल हे नक्की आहे.
आता फ्रान्स लीगमधील प्रसिद्ध क्लब पॅरिस सेंट जर्मनमध्ये खेळणारा मेस्सी आजही तितकाच दमदार खेळ करत आहे. फुटबॉल जगतातील मानाचा बलॉन डी’ऑर हा खिताब मेस्सीने सर्वाधिक ७ वेळा मिळवला आहे.