(नवी दिल्ली)
भारतीय नौदलाच्या आठ माजी कर्मचाऱ्यांना एका प्रकरणात कतारच्या न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. हे कर्मचारी दीर्घकाळापासून कतारच्या तुरुंगात आहेत. या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी सोमवारी सांगितले की, या आठही भारतीयांच्या सुटकेसाठी आणि त्यांना भारतात सुखरुप आणण्यासाठी भारत सरकार सर्व ते प्रयत्न करेल.
जयशंकर यांनी माजी नौसैनिकांच्या कुटुंबियांच्या भेटीदरम्यान सांगितले की, भारत सरकार या भारतीयांना परत आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. सरकार या प्रकरणाला सर्वोच्च प्राधान्य देत आहे. आम्ही या नौसैनिकांच्या कुटुंबियांची चिंता आणि वेदना समजू शकतो. त्यासाठी आम्ही याबाबत सर्व कुटुंबांच्या संपर्कात राहू. अल दाहरा या खासगी कंपनीत काम करणाऱ्या या भारतीय नागरिकांना गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये कथित हेरगिरी प्रकरणात अटक करण्यात आली होती. त्याच्यावरील आरोपांचा कतारकडून अद्याप खुलासा करण्यात आलेला नाही. मात्र, हे लोक हेरगिरीच्या आरोपाखाली पकडले गेल्याचा दावा काही अहवालांमध्ये करण्यात आला आहे.
कतार न्यायालयाच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त करत भारताने उभय देशांमधील संबंधांत हा मोठा अडथळा असल्याचे वर्णन केले होते. या प्रकरणी सर्व कायदेशीर पद्धती वापरून प्रयत्न करणार असल्याचे सांगितले होते.