( दापोली/प्रतिनिधी )
दापोली तालुक्यातील फणसू आरोग्य केंद्राअंतर्गत असलेल्या २२ गावातील रुग्णांना वेळेत वैद्यकीय उपचार मिळत नसल्याने येथील रुग्णसेवा रामभरोसे असून रुग्णांना वाऱ्यावर टाकत असल्याचा भावना नागरिकांमधून उमटत आहेत. येथील आरोग्य केंद्रात सकाळी ८:३० वाजता बाह्य रुग्ण विभाग सुरू होतो. मात्र वैद्यकीय अधिकारी हे दापोली तालुक्याचे बाहेर राहत असल्याने आणि त्यामुळे आरोग्य केंद्रात वेळेत येत नसल्याने रुग्णांच्या उपचाराबाबत हेळसांड होत आहे. तर येथील डॉक्टरांचे कारभाराला कंटाळून २२ गावातील अनेक रुग्णांनी आरोग्य केंद्राकडे पाठ फिरविल्याचे चित्र दिसत आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्र फणसू येथे दोन वैद्यकिय अधिकाऱ्यांची नियुक्ती आहे. मात्र यातील एकही वैद्यकिय अधिकारी निवासी रहात नाहीत आणि वेळेत आरोग्य केंद्रात येत नाहीत. त्यामुळे येथील रुग्णांना नाइलाजास्तव खाजगी दवाखान्याचा आधार घ्यावा लागत आहे. वैद्यकिय अधिकारी हे उशीरा का येतात, या बाबत येथील कर्मचारी यांचेशी माहिती घेतली असता डॉक्टर मंडणगड मधून येत असल्याचे सांगण्यात आले.
येथील २२ गावातील लोकसंख्या ही १५ हजारच्या जवळपास आहे. यातील कित्येक गाव ही दुर्गम आहेत. त्यामुळे साप, विंचू दंश आदी सारख्या रुग्णांना येथे वेळेत उपचार मिळत नाहीत. अशा वेळेस रुग्णांना तालुक्याचे ठिकाणी घेऊन जावे लागतात. त्यामुळे येथील आरोग्य केंद्र हे स्थानिकांना तर नसल्यासारखेच आहे.
या बाबत जिल्हा आरोग्य विभाग येथील वैद्यकिय सेवा सुधारावी म्हणून प्रयत्न करणार का? असा सवाल देखील या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. आरोग्य केंद्राची डागडुजी आणि रंगकाम, निवास्थान दुरूस्ती गतवर्षी करण्यात असलेली आहे. परिसर सुशोभीकरण देखील करण्यात आले आहे. तरी देखील वैद्यकिय अधिकारी निवासी रहात नाहीत. वैद्यकिय अधिकारी निवासी राहण्याबाबत नुकतेच आरोग्य विभागाने एक परिपत्रक जारी केले आहे. मात्र आरोग्य विभागाच्या या आदेशाला वैद्यकिय अधिकारी जुमानत नसल्याचे चित्र दिसत आहे.