(रत्नागिरी)
प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती जिल्हा शाखा रत्नागिरी यांच्यावतीने दि.८ ऑगस्टला राज्यव्यापी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी, चिपळूण, दापोली प्रांत कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष प्रकाश काजवे यांनी दिली.
राज्यात प्राथमिक शिक्षकांची हजारो पदे रिक्त असून ती भरण्याबाबत शासन स्तरावरून कोणतीही कार्यवाही केली जात नाही. केंद्रप्रमुखांच्या ४८६० पैकी ७० टक्के पदे रिक्त आहेत. सेवाज्येष्ठ पदवीधर शिक्षक, सहशिक्षकांकडे त्याचा पदभार देण्यात आल्याने गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यात प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली आहे.
समितीच्या धरणे आंदोलनाची नोटीस राज्य शासनाला देण्यात आली असून प्रलंबित असलेल्या ३८ मागण्यांच्या पूर्ततेची आग्रही भूमिका समितीने स्वीकारली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळांमधील गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याच्या दृष्टीकोनातून विद्यार्थी, शिक्षकांच्या न्यायसंगत मागण्या दीर्घकाळ प्रलंबित आहेत. कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या दोन वर्षांच्या कार्यकाळात विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान झाले आहे.