(रत्नागिरी)
रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळे येथील प्राचीन कोकण संग्रहालयाला उद्या १५ डिसेंबर २०२२ रोजी १८ वर्ष पूर्ण करुन १९ व्या वर्षात पदार्पण करत आहे. सन २००४ मध्ये वैभव सरदेसाई यांच्या संकल्पनेतून या संग्रहालयाची निर्मिती करण्यात आली. तत्कालीन जिल्हाधिकारी संतोष कुमार यांच्या हस्ते या संग्रहालयाचे उद्घाटन करण्यात आले. या संग्रहालयासाठी वामन बापट यांनी आपली जागा उपलब्ध करून दिली आहे. श्री.बापट स्वतः वृक्षप्रेमी असून त्यांचे प्राचीन कोकण संग्रहालयासाठी वेळोवेळी सहकार्य लाभते असे यावेळी बोलताना वैभव सरदेसाई यांनी सांगितले. वर्धापन दिनी प्राचीन कोकण येथे प्रतिवर्षाप्रमाणे पर्यटकांचे स्वागत केले जाणार आहे.
प्राचीन कोकण हे महाराष्ट्रातील पहिले ओपन एअर संग्रहालय आहे. गणपतीपुळे येथील तीन एकर परिसरामध्ये ५०० वर्षांपूर्वीच्या कोकणची समाजरचना , व्यवसाय, वेषभूषा , परंपरा , इतिहास यांचे दर्शन घडविणारे संपूर्ण खेडगावच निर्माण करण्यात आले आहे. तसेच यामध्ये १०० पेक्षा जास्त प्रकारचे औषधी वृक्ष, नक्षत्र बाग , स्पाईस गार्डन , देखील आहे. जांभ्या दगडाची पुरातन पाखाडी वेड्या वाकड्या वळणांची लाल मातीच्या पायवाटेवरून व सोबत झूळू झूळू वहाणारा पाटाच्या पाण्याचे संगीत ऐकत पर्यटक संग्रहालयाने पुरविलेल्या स्वागतिकेसोबत गावात फेरफटका मारतात.
प्राचीन कोकणमध्ये सागरामध्ये सापडणाऱ्या १६० पेक्षा जास्त प्रकारच्या शंखाचे प्रदर्शन पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहे. प्राचीन कोकण संग्रहालयाची दखल विविध क्षेत्रातून घेतली आहे . सन २०१२ तत्कालीन गृहमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते प्राचीन कोकणच्या व्यवस्थापक सौ स्वरुपा सरदेसाई यांना प्रदान करण्यात आला तर वैभव सरदेसाई यांना पोलादी पुरुष पुरस्कार मिळाला आहे. सन २०२२ मध्ये बिझनेस आयकाॅन पुरस्कारने गौरवण्यात आले आहे.