(राजापूर)
रुग्णालयाच्या डोळ्याच्या शस्त्रक्रियेसाठी येणाऱ्या डॉक्टराचे रेल्वे प्रवासात चोरट्याने २० हजार रुपये लंपास केले. हा प्रकार रविवारी (५ नोव्हेंबर) सकाळी ७:३० वाजता राजापूर रेल्वे स्थानकात घडला.
या चोरीबाबत डॉ. देवेंद्र पांडुरंग जाधव (४८, रा. दमखाडी, रोहा, जि. रायगड) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांचा खासगी वैद्यकीय व्यवसाय असून, ते राजापूर येथे एका रुग्णाच्या डोळ्यांच्या शस्त्रक्रियेसाठी पनवेलहून रेल्वेने राजापूर येथे आले. राजापूर रेल्वे स्थानकात सकाळी उतरल्यानंतर खासगी गाडीने निघण्यासाठी निघाले. गाडीत बसण्यापूर्वी त्यांना आपले पाकीट चोरीला गेल्याचे लक्षात आले.
या पाकिटात २० हजार रोख रक्कम होती, तसेच बँकेचे क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, गाडी चालविण्याचा परवाना, दोन रेल्वेची तिकिटे आणि एक सीम कार्ड चोरट्याने लंपास केले आहे. याबाबत देवेंद्र जाधव यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी राजापूर पोलिस स्थानकात याबाबत फिर्याद दाखल केली आहे. याप्रकरणी अधिक तपास राजापूर पोलिस स्थानकाचे पोलिस करीत आहेत.