देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट याच महिन्याच्या अखेरीस ओसरेल, असे भाकीत वर्तविले जात असतानाच, प्रख्यात विषाणू तज्ज्ञ शाहिद जमील यांनी मात्र ही लाट जुलैपर्यंत कायम राहणार असल्याचा इशारा दिला आहे. या काळात कोरोनाच्या दुसर्या लाटेत चढ-उतारही पाहायला मिळेल. कधी बाधितांची संख्या एकदम कमी झालेली तर कधी मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसेल, असे त्यांनी सांगितले.
देशातील कोरोनाबाधितांची संख्या इतक्या मोठ्या प्रमाणात वाढण्यासाठी नवीन व्हेरिएंट कारणीभूत असला, तरी कोरोनाचा हा नवा प्रकार घातक आहे, हे सिद्ध करणारे कोणतेही पुरावे नाहीत, असे अशोका विद्यापीठातील जैव-विज्ञान शाखेचे संचालक असलेले जमील यांनी सांगितले. देशात कोरोनाने सर्वोच्च शिखर गाठले, असे आताच म्हणता येणार नाही. या लाटेत प्रचंड चढ-उतार पाहायला मिळत आहे. शिखर गाठणारी लाट सतत वर जात असते, ती खाली येत नाही. हा चढ-उतार जुलैपर्यंत राहण्याची शक्यता आहे. या काळात देशात दररोज तीन ते चार लाख बाधित आढळून येतील, यात शंका नसल्याचे ते म्हणाले.
पहिल्या लाटेच्या काळात बाधितांच्या संख्येत मर्यादित स्वरूपात वाढ होत असल्याचे आपण पाहिले आहे. त्यानंतर लाटेच्या उतरत्या क्रमातील सातत्यताही अनुभवली. पहिल्या लाटेत एक लाखावर बाधित दिसत नव्हते, पण आता चार लाख किंवा त्यापेक्षा जास्त बाधित आढळत आहेत. ही दुसरी लाट ज्यावेळी सर्वोच्च शिखर गाठेल, त्यावेळी आपण बाधितांचा आकडा किती राहील, याचा अंदाजही लावू शकणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.