(बंगळुरू)
चांद्रयान-३ ची एक मोठी अपडेट सध्या समोर आली आहे. चंद्रावरील विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर नव्या नियोजनानुसार आज २३ सप्टेंबर रोजी संध्याकाळी कार्यान्वित करण्यात येणार आहे. स्पेस अॅप्लिकेशन सेंटरचे संचालक निलेश देसाई यांनी सांगितले की, चंद्राच्या ज्या भागात विक्रम लँडर उतरले, तिथे चौदा दिवसांनंतर पुन्हा एकदा सूर्य उगवला आहे. त्यामुळे नुकताच आम्ही प्लान केला होता की, २२ सप्टेंबर रोजी संध्याकाळी प्रज्ञान रोव्हर आणि विक्रम लँडरला पुनरुज्जीवित करायचे. पण काही अपरिहार्य कारणांमुळे हे काम म्हणजेच २३ सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आले.
कालपासून चंद्रावर दिवस सुरू झाला. त्यामुळे स्लीप मोडवर गेलेल्या विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरशी संपर्क करण्यास इस्रोने सुरुवात केली. विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर यांची स्थिती जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी संपर्क स्थापित करण्याचा प्रयत्न करण्यात आला. सध्या त्यांच्याकडून कोणताही संकेत मिळाला नसल्याचे इस्रोने सांगितले. रोव्हर आणि लँडरसोबत संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती इस्रोने दिली.
चांद्रयान-३ मोहिमेचा लँडर ४ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ८ वाजता स्लीप मोडमध्ये गेला. याआधी चॅसेट, रंभा-एलपी आणि आयएलएसए पेलोडने नवीन जागेवर इन-सीटू प्रयोग केले असल्याची माहिती इस्रोने दिली होती. त्यांनी जमा केलेली माहिती पृथ्वीवर पाठवण्यात आली. ४ सप्टेंबर रोजी पेलोड बंद करण्यात आले होते.
सोलर पॅनल होणार चार्ज
चंद्रावर आज पुन्हा दिवस सुरू झाला. त्यामुळे सौर पॅनेल सूर्यप्रकाशाने चार्ज होणे अपेक्षित आहे. विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर हे दोन्ही चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर आहेत. या ठिकाणी आज दिवस उजाडेल आणि सूर्यकिरणे येतील, अशी इस्रोला अपेक्षा आहे. रोव्हर आणि लँडरचे सोलर पॅनेल चार्ज झाल्यानंतर दोन्ही पुन्हा इस्रोच्या संपर्कात येतील असे म्हटले जात आहे.
चंद्रावरील मुलद्रव्यांचा शोध
रोव्हर चंद्रावर उतरल्यानंतर त्याने अनेक मुलद्रव्यांचा शोध घेतला. त्यानुसार चंद्रावर सल्फर, ऑक्सिजन, पाण्याचा अंश असल्याचे दिसून आले. त्याचबरोबर हायड्रोजनही चंद्रावर असल्याचे रोव्हरवरील विविध प्रकारच्या उपकरणातून समोर आले. त्यामुळे ही केवळ भारतासाठीच नव्हे तर जगासाठी महत्वाची गोष्ट आहे.