(नवी दिल्ली)
2024 चा प्रजासत्ताक दिन अर्थात 26 जानेवारी सर्वच दृष्टीने अनोखा ठरावा यासाठी संरक्षण मंत्रालयाने एक आगळीवेगळी सूचना केली आहे. कर्तव्यपथावरील प्रजासत्ताक दिन संचलनात फक्त महिला सैनिक, अधिकारी आणि महिलांचा बँड हवा. त्याचबरोबर वेगवेगळ्या चित्ररथांवरही महिलाच हव्यात, अशी ही सूचना आहे.
या संदर्भातील सविस्तर पत्र संरक्षण मंत्रालयाने सैन्य दलाच्या विविध तुकड्यांना पाठविले आहे. त्यामुळे अर्थातच यंदाचा 2024 चा प्रजासत्ताक दिन केवळ भारतासाठीच नव्हे, तर संपूर्ण जगातल्या लष्करी संचालनांसाठी अनोखा ठरणार आहे. कारण जगभरात सर्व सैन्य दलांमध्ये महिलांचा सहभाग आहे. पण फक्त महिला सैनिक, अधिकारी यांचे संचलन एकाही देशाने आयोजित केलेले नाही. भारताने त्यात आघाडी घेण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठीच तब्बल 9 महिने आधी संरक्षण मंत्रालयाने पुढाकार घेऊन सर्व सैन्य तुकड्यांच्या प्रमुखांना त्या संदर्भात पत्र पाठविले आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात सैन्य दलाच्या वेगवेगळ्या तुकड्या समाविष्ट असतातच. त्याचबरोबर सैन्य शक्तीचे प्रदर्शन करण्यासाठी वेगवेगळी युद्धसामग्री, रणगाडे विमाने नौदलाचे वेगवेगळे रथ तसेच राज्यांचे चित्ररथ देखील सहभागी होत असतात. या सर्व ठिकाणी फक्त महिलांनी प्रतिनिधित्व करावे, अशी संरक्षण मंत्रालयाची सूचना आहे.
आता त्या दृष्टीने वेगवेगळ्या तुकड्यांमधल्या महिला सैनिक आणि अधिकाऱ्यांची निवड करणे, चित्ररथांची संकल्पना मांडून निवड करणे हे संबंधित अधिकाऱ्यांपुढे मोठे आव्हान आहे. अनेक तुकड्यांमध्ये महिला सैनिक आणि अधिकारी कमी प्रमाणात आहेत. त्यामुळे त्यांना संचलनासाठी तयार करून नवी दिल्लीला पाठविण्याचे विशिष्ट धोरण आता वेगवेगळ्या तुकड्यांचे प्रमुख आखू लागले आहेत. तसेच वेगवेगळ्या राज्यांनीही फक्त महिला प्रतिनिधी असतील अशा स्वरूपाचे चित्ररथांच्या संकल्पना मांडायला सुरुवात केली आहे.