(राजापूर)
तालुक्यातील बारसू-सोलगाव परिसरातील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाला ग्रामस्थांचा विरोध असून प्रकल्पविरोधी आंदोलकांना खोट्या खटल्यामध्ये अडकवून करण्यात आलेल्या तडीपारीच्या कारवाईच्या निषेधार्थ बारसू-सोलगाव पंचक्रोशी रिफायनरी विरोधी संघटन येत्या बुधवारी (ता. २५) एक दिवसाचे धरणे आंदोलन करणार आहे. राजापूर पोलिस ठाण्याच्या आवारात हे आंदोलन करण्यात येणार असून त्याला परवानगी मिळावी, अशी मागणी सोलगाव-बारसू पंचक्रोशी रिफायनरीविरोधी संघटनेकडून केली आहे. सकाळी १० ते सायंकाळी ५ वा. या कालावधीमध्ये करण्यात येणाऱ्या धरणे आंदोलनाला परवानगी मिळण्याबाबतचे निवेदन बारसू-सोलगाव पंचक्रोशी रिफायनरीविरोधी संघटनेचे अध्यक्ष अमोल बोळे आणि सहकाऱ्यांनी प्रांताधिकारी वैशाली माने यांना दिले.
तालुक्यातील बारसू-सोलगाव परिसरामध्ये रिफायनरी प्रकल्प उभारण्याच्या जोरदार हालचाली शासनस्तरावर सुरू आहेत. त्याला या परिसरातील लोकांकडून तीव्र विरोध केला जात आहे. दरम्यान, प्रकल्पाला विरोध करणाऱ्या विरोधी संघटनेच्या काही प्रमुख नेत्यांवर तडीपारीची कारवाई करण्यासाठी गावपातळीवर न येता तडीपारासंबंधित खोटे अहवाल तयार करण्यात आल्याचे रिफायनरी विरोधकांचे म्हणणे आहे. प्रकल्प आंदोलकांवर तडीपारीची कारवाई करण्याचा बडगा उगारला जात असताना दुसरीकडे बेकायदा सर्व्हेक्षण करणाऱ्यांच्या विरोधात मात्र कुठलीही कारवाई केली जात नसल्याचे नमूद करत प्रकल्प विरोधकांकडून त्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. यातून, बारसू-सोलगाव रिफायनरीविरोधी संघटनेने तडीपारीच्या कारवाईच्या निषेधार्थ आता धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.
येत्या बुधवारी (ता. २५) सकाळी १० ते सायंकाळी ५ वा. या कालावधीमध्ये राजापूर पोलिस ठाण्याच्या आवारात हे धरणे आंदोलन केले जाणार आहे. त्याला परवानगी मिळण्याची मागणी विरोधी समितीकडून निवेदनाद्वारे प्रांताधिकारी माने यांच्याकडे केली आहे. या निवेदनाच्या प्रती तहसीलदार आणि राजापूर पोलिस ठाण्याला देण्यात आल्या आहेत. रिफायनरीविरोधी संघटनेला धरणे आंदोलन करण्याला परवानगी मिळणार का आणि धरणे आंदोलन होणार का? याकडे आता साऱ्यांचे लक्ष लागले आहे.