(बीड)
मागील काही वर्षात पोलीस भरती प्रकरणात होणाऱ्या घोटाळ्यांची यादी वाढतच चालली आहे. दरम्यान, यात सतत बीड कनेक्शन समोर येत आहे. आता पुन्हा एकदा पुणे पोलीस भरतीत बनावट प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र काढणाऱ्या आरोपींमध्ये देखील बीडच्या आरोपींचा समावेश असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे, या प्रकरणी बीडमधील दहा जणांविरोधात पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हे सर्व प्रकल्पग्रस्ताचे बनावट प्रमाणपत्र बीड जिल्ह्यात तयार झाल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.
2021 मध्ये झालेल्या पुणे ग्रामीण पोलीस भरतीमध्ये बोगस प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र काढल्या प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुणे पोलीस तपास करत आहे. त्यामुळे यात आणखीन काही आरोपींचे नावं समोर येण्याची शक्यता आहे. यापूर्वी देखील बीडमधून बोगस प्रमाणपत्र काढणाऱ्याविरोधात विदर्भात गुन्हे दाखल करण्यात आले होते. आता पुन्हा पुण्यामध्ये देखील हे बनावट प्रमाणपत्र पोलीस भरतीसाठी वापरल्याचे उघड झाला आहे. त्यामुळे या टोळीचा अधिक तपास पुणे पोलीस करत आहेत.
काही दिवसांपूर्वी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पोलीस भरतीमध्ये घोटाळा झाल्याचे समोर आले होते. यावेळी झालेल्या पेपर फुटी प्रकरणांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. विशेष म्हणजे, पिंपरी चिंचवडमध्ये झालेल्या या पोलीस भरती पेपर फुटी प्रकरणात एकूण 149 आरोपी असून, यातील 33 आरोपी हे बीड जिल्ह्यातील असल्याचे समोर आले होते. त्यात आता पुन्हा एकदा पुणे पोलीस भरतीत बनावट प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र काढणाऱ्या बीड मधील दहा जणांविरोधात पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे सतत पोलीस भरती घोटाळ्यांमध्ये बीड कनेक्शन समोर येत असल्याचे पाहायला मिळत आहे.