(मुंबई)
मुंबईच्या चुनाभट्टी पोलीस ठाणे हद्दीत गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. दिवसा ढवळ्या गोळीबार झाल्याने चुनाभट्टी हादरली आहे. दुपारच्या ३ च्या दरम्यान ही गोळीबाराची घटना घडली. या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला असून अन्य तीन जण जखमी झाले आहेत. जखमींवर सायन रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आझाद गल्ली चुनाभट्टी भट्टी या रस्त्यावर ही घटना घडली. १६ ते १७ राऊंड फायर झाल्याची माहिती आहे. पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. घटनास्थळी गोळ्यांच्या पुंगळ्या देखील दिसत होत्या. याबाबत पोलिसांचा अधिक तपास सुरु आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चुनाभट्टी परिसरातील स्थानिक गुंड असलेल्या पप्पू येरुणकरवर याच्यावर गोळीबार करण्यात आला.अंतर्गत वादातून हा हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. इतर दोन ते तीन लोकांवरही गोळीबार करण्यात आला आहे. एका वाहिनीने दिलेल्या बातमीनुसार, स्थानिक गुंड पप्पू येरुणकर याचा या गोळीबाराच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. तर अन्य दोन तीन जण जखमी झाले असून त्यांच्यावर सायन रुग्णालयात उपचार सुरु असून त्यांची परिस्थिती गंभीर असल्याची माहिती आहे.
गोळीबार झालेल्या व्यक्तींची नावं
(1) सुमित (पप्पू ) येरुणकर वय 46 वर्ष – याच्या पोटाला व डाव्या खांद्याला अशा दोन गोळया लागल्या आहेत. (मयत )
(2) रोशन निखिल लोखंडे वय 30 वर्ष – याच्या उजव्या मांडीला एक गोळी लागली आहे.
(3) मदन पाटील वय 54 वर्ष – यांच्या डाव्या काखेत एक गोळी लागली आहे.
(4) आकाश खंडागळे, वय 31 वर्ष – याच्या उजव्या हाताच्या दंडावरती एक गोळी लागली आहे.
(5) त्रिशा शर्मा, वय 8 वर्ष – हिच्या उजव्या हाताला गोळी लागली आहे.
पप्पू येरुणकर याच्यावर विविध गुन्हे दाखल करण्यात आले असून त्याची याआधी तुरुंगवारीही झाली आहे. तसेच त्याचे अनेक लोकांसोबत जुने वाद आहेत. मात्र, हल्ल्याचं नेमकं कारण अद्याप समोर आलं नाही. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन संपूर्ण परिसरात आपल्या ताब्यात घेतला आहे.