(मुंबई)
पोलिसांना गेल्या ६ महिन्यांपासून प्रवासभत्ता तसेच वेतनवाढ देण्यात आलेली नाही. याबाबत पोलिसांमध्ये असंतोष असून आपल्या मागण्यांसाठी त्यांना कुठेही दाद मागता येत नाही. मुंबई पोलिस दलातील एका सहाय्यक फौजदाराने मात्र याबाबत हिंमत दाखवत थेट राज्यपाल, मुख्यमंत्री, महासंचालक, अतिरिक्त पोलिस आयुक्त व उपायुक्तांकडे तक्रार केली आहे. परंतु या सहाय्यक फौजदाराला आता अंतर्गत कारवाईला सामोरे जावे लागत आहे.
सहायक फौजदारांवर केलेल्या कारवाईवरून पोलिस दलातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. पोलिस हे शिस्तप्रिय दल असून वेळेवर वेतन मिळाले नाही, देय असलेला भत्ता, लागू झालेली वेतनवाढ ६-६ महिने मिळत नसेल तरीही पोलिसांनी शांत बसून राहायचे, असाच संदेश देण्यासाठी ही कारवाई केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. ६ महिन्यांपासून थकीत प्रवास भत्ता आणि दरमहा जारी झालेली वेतनवाढ मिळावी, यासाठी अनेक पोलिसांनी आपल्या वरिष्ठांकडे तगादा लावला होता. मात्र, याबाबत लेखी तक्रार करण्याची पद्धत नसल्याने हे पोलिस शांत राहिले होते.
दरम्यान, एका सहायक फौजदारानी याबाबतचा अर्ज थेट राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे केला. या अर्जाच्या प्रती मुख्यमंत्री तसेच पोलिस महासंचालक व सर्व वरिष्ठ पोलिस अधिका-यांना पाठवल्या. मात्र, त्यांचे हे वर्तन बेशिस्त व उद्धट असून पोलिसांची प्रतिमा मलिन करणारे असल्याचा ठपका ठेवत २ वर्षे वेतनवाढ का रोखू नये, याबाबत त्यांनाच कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याचे समजते.
पोलिसांना कामगार संघटना बनविण्याचा अधिकार नाही. मात्र अशा पद्धतीने रीतसर आपल्या मागण्या मांडल्यावर पोलिसांवर कारवाई होणार असेल तर आम्ही दाद तरी कोणाकडे मागायची, असा सवाल पोलिस करत आहेत. याबाबत पोलिसांमध्ये कमालीचा असंतोष असल्याचे सांगितले जात आहे.