(पुणे)
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. राज्यातील निकाल – ९६.९४ % इतका लागला. यंदा कोकण विभागाची बाजी तर नाशिक विभाग सर्वात शेवटी असल्याचं समोर आलं आहे. दरम्यान, पुण्यात राहणाऱ्या विद्यार्थ्याने दहावीच्या बोर्डात सर्व विषयात ३५ गुण मिळवण्याची कमाल करणाऱ्या विद्यार्थ्याची चर्चा सोशल मीडियावर जोर धरू लागली आहे.
दहावीच्या परीक्षेत चांगले गुण मिळवण्याठी विद्यार्थी-विद्यार्थिनी खूप मेहनत घेतात. या मेहनतीच्या जीवावर अनेक विद्यार्थ्यांना दहावीच्या परीक्षेत उत्तुंग यश मिळवतात. परीक्षेत चांगले गुण मिळवण्यासाठी प्रत्येक विषयाचा कसून अभ्यास करतात. ९० किंवा ९९ टक्के मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचे समाजाच्या सर्व स्तरातून भरपूर कौतुक होतं. या विद्यार्थ्यांवर अभिनंदनांचा वर्षाव होतो. मात्र, दुसरीकडे पुण्यातल्या गंजपेठेतील राहणाऱ्या दहावीच्या विद्यार्थ्याची सर्वत्र जोरदार चर्चा होत आहे. त्याला कारणही तसंच आहे. कारण या पठ्ठ्याने दहावी बोर्डात सर्वच विषयात ३५ गुण मिळविण्याचा प्रताप केला आहे.
गंजपेठेमध्ये राहणाऱ्या शुभम जाधव या विद्यार्थ्याने दहावीच्या बोर्डात सर्व विषयात ३५ गुण मिळवण्याचा प्रताप केला आहे. तो रमनबाग शाळेत शिकत होता. शुभम भवानी पेठेतील एका हार्डवेअरच्या दुकानात कामाला देखील जातो. तर आई वडील देखील मोलमजुरी करतात. शुभमला पुढे जाऊन पोलिस बनायचं आहे, त्यासाठी कॉमर्सला प्रवेश घ्यायचा आहे. काम करता करताही दहावीच्या परीक्षेत ३५ टक्के मिळवूनही शुभमचे सर्वत्र कौतुक होत आहे.