मुंबई/प्रतिनिधी
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानुसार, पुढील 2 दिवस कोकण किनारपट्टीवर वादळी वार्यासह अवकाळी पाऊस पडण्याच्या शक्यतेने कोकणातील सर्व जिल्ह्यांना अलर्ट राहण्याच्या सूचना हवामान विभागाने दिल्या आहेत. काल दि. २४ एप्रिल रोजी ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तुरळक ठिकाणी पाऊस पडला. त्यानंतर आता दोन दिवस म्हणजे दि.२५ एप्रिल रोजी रायगड आणि रत्नागिरी जिल्हयातील तुरळक ठिकाणी पाऊस पडेल तर दि. २६ एप्रिल, रोजी रत्नागिरी जिल्हयातील काही ठिकाणी मेघगर्जना, विजेचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
सतत होणारे हवामानातील फेरबदल आणि अवकाळी पाऊस यामुळे लाखोंचा हापूस आंबा विक्री करणारा शेतकरी आर्थिक संकटात आहे. अनेक शेतकऱ्यांचे वार्षिक आर्थिक गणित हे आंबा आणि काजू उत्पन्नावर अवलंबून असते. आंबा नुकसानीमुळे हे वर्ष शेतकऱ्यांसाठी मोठे नुकसानीत गेले आहे. अनेक व्यावसायिक बागायतदार यांनी अन्य शेतकऱ्यांच्या बागा या हंगामी फळांसाठी ठराविक रकमेवर घेतल्या आहेत. मात्र, या बागा पार करपून गेल्या आहेत. त्यामुळे अनेकांचे आर्थिक संकट वाढले आहे. अवकाळी पाऊस सतत पडत असल्याने शेतकरी वर्गाची चिंता वाढली आहे.