शासनाच्या निर्देशानुसार यापुढे पुढील आदेश येईपर्यंत रत्नागिरी जिल्ह्यात फक्त ४५ वर्षावरील नागरिकांचेच लसीकरण करण्यात येणार आहे. सर्वप्रथम लसीचा दुसरा डोस आहे, अशा नागरिकांना प्राधान्य देण्यात येणार आहे. जर लसींचा साठा उरला तर ४५ वर्षावरील नागरिकांनाच पहिला डोस दिला जाईल. ग्रामीण भागासाठी ऑनलाईन नोंदणीवर अवलंबून न राहता टोकन पध्दतीचा अवलंब करून लसीकरण करण्यात येणार आहे. अशी माहिती रत्नागिरी जिल्हा परिषद जिल्हा आरोग्य अधिका-यांनी दिली आहे.
लसीकरणाच्या नियोजनाबाबत जिल्हा प्रशासनातर्फे रोज दुपारी १२.०० वाजता लसीकरणाबाबत शहरी भागातील व ग्रामिण भागातील कोणत्या केंद्रावर किती लसी दिल्या जातील याविषयी माहिती दिली जाईल. त्यानुसार नागरिकांनी नियोजनाचे अवलोकन करून आपला पहिला किंवा दूसरा डोस घ्यावा. रोज दुपारी 12.00 वाजता दिल्या जाणाऱ्या माहिती पत्रकात लसीकरण केंद्रनिहाय किती लसी उपलब्ध आहेत, कोणत्या वयोगटासाठी आहे व कोणत्या सत्रात दिल्या जातील, याची माहिती शहरी व ग्रामीण भाग असे वर्गीकरण करून दिली जाईल. त्यानुसार लाभार्थी नागरिकांनी आपला डोस निश्चित करून तो संबंधित केंद्रातून घ्यावा. सर्वात महत्वाची बाब म्हणजे यापुढे ग्रामीण भागासाठी ऑनलाईन नोंदणीवर अवलंबून न राहता टोकन पध्दतीचा अवलंब करून लसीकरण करण्यात येणार आहे. याचा खूप मोठा दिलासा ग्रामीण भागातील नागरीकांना मिळणार आहे.
प्रत्येक लसीकरण केंद्रावर नागरिकांनी लसीच्या उपलब्धतेनुसार आपले टोकन घेऊन कोणत्याही प्रकारची गर्दी न करता शांततेने लस घ्यावी. शहरी भागासाठी मात्र फक्त आणि फक्त ऑनलाईन नोंदणी असणा-यांनाच लस दिली जाईल. यापुढे लसीचा साठा सुरळीत व योग्य प्रमाणात होणार असून नागरिकांनी घाबरुन जाण्याची आवश्यकता नाही.
सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की रोज दुपारी १२.०० वाजता cowin.gov.in या वेबसाईटवर आपल्या विभागाच्या पिनकोड प्रमाणे लसींचे अपडेट पहावेत. त्यामुळे लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांनी आपली नोंदणी झाली असेल तर संबंधित केंद्रावर थांबावे. कारण त्या केंद्रावर नियोजनानुसार जेवढ्या लसी उपलब्ध आहेत तेवढ्याच देण्यात येतील. त्यामुळे नागरिकांनी गर्दी करू नये व विनाकारण केंद्रावर न थांबता आपल्या वेळेचा अपव्यय करण्यात येवू नये.