(नवी दिल्ली)
पुढील वर्षांतील काही महिने हे अतितीव्र उष्णतेचे असणार आहेत. यंदाच्या वर्षी झालेली उष्णता सर्वांनीच अनुभवली आहे. आता येणारे वर्षंही असेच असणार आहे, संपूर्ण जग त्यात होरपळून निघणार आहे. त्यासाठी सर्वांनी सतर्क राहावे, अशी सूचना जागतिक हवामान खात्याने केली आहे.
या अतितीव्र उष्णतेला कारणीभूत अल निनो असणार आहे. याशिवाय वातावरणातील कार्बन डायऑक्साईड आणि माणसांच्या पर्यावरणाला घातक कृत्यांमुळे ही उष्णतेची लाट येणार आहे, असेही हवामान खात्याने म्हटले आहे. जीवाश्म इंधन जाळल्याने दरवर्षी ४० अब्ज टन कार्बन डायऑक्साईड तयार होतो. याचा प्रतिकूल परिणाम हवामानावर आणि पर्यावरणावर झाला आहे. या वर्षाच्या सुरुवातीलाच संशोधकांनी जमीन आणि समुद्रातील वाढत्या हवामानाविषयी चिंता व्यक्त केली होती. स्पेन, ऑस्ट्रेलिया येथील विक्रमी उष्णतेनंतर अनेक ठिकाणी उष्णतेची लाट आली. दक्षिण अमेरिकेतही उष्णता आणि उच्च तापमानाची नोंद झाली. बर्फाने वेढलेल्या अंटार्क्टिकासारख्या थंड प्रदेशात हिवाळ्यात ८.७ अंशापर्यंत पोहोचले. उत्तर आफ्रिकेत तापमान ५० अंशावर पोहोचले आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पॅसिफिक महासागरात अल निनोचा प्रभाव कायम आहे. अल निनोमुळे संपूर्ण जगाच्या हवामान पद्धतीत बदल होतो. अल निनोचा भारतावर चार प्रकारे परिणाम होऊ शकतो. त्यामुळे आपल्याकडे पाउस कमी पडून दुष्काळ पडण्याची ६० टक्के शक्यता आहे. कमी पावसामुळे अन्नधान्याचा तुटवडा जाणवू शकतो. अल निनो आणि दुष्काळामुळे महागाई कमी होण्याऐवजी वाढू शकते.