(मुंबई)
पुढच्या वर्षीपासून रस्त्यावर किंवा चौकात दहीहंडी उत्सव साजरा करण्यास परवानगी देऊ नका तर मोकळ्या मैदानात दहीहंडी उत्सव साजरा करण्यासाठी नियोजन करा. त्यासाठी नव्याने धोरण निश्चित करा, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी राज्य सरकारला दिले. परंपरा, संस्कृती जपताना सामाजिक भानही राखले पाहिजे. आयोजकांनीही बदलत्या परिस्थितीचा नीट अभ्यास करायला हवा. शहरांमध्ये लोकसंख्या वाढत चालली आहे. पण पायाभूत सुविधा आजही ५० वर्षांपूर्वीच्याच आहेत, रस्त्यांची लांबी वाढलेली नाही. पण वाहतूककोंडी प्रचंड वाढली आहे.
रस्त्यावर उत्सवाला परवानगी दिल्याने त्याचा नाहक त्रास सर्वसामान्यांना होतो. त्यामुळे वर्षानुवर्षे सुरू असलेल्या परंपरा आता कुठे तरी बदलायला हव्यात. त्यासाठी नवीन धोरण निश्चित करण्याची आवश्यकता आहे. हे धोरण असे तयार करा की सण उत्सवांमुळे वाहतूक कोंडी होणार नाही, गर्दी होणार नाही, नागरिकांना त्रास होणार नाही. निदान पुढील वर्षी तरी उत्सवाआधी हे धोरण निश्चित करा, असे आदेश न्यायमूर्ती सुनील शुक्रे आणि न्यायमूर्ती फिरदोस पुनावाला यांच्या खंडपीठाने हे आदेश दिले आहेत.