पुढील काही दिवसांत पीएफ अर्थात् भविष्य निर्वाह निधी खात्यातील व्याजाचा दर कमी होण्याचे संकेत आहेत. सरकारच्या या निर्णयाचा थेट परिणाम देशभरातील साडेसहा कोटींपेक्षा अधिक नोकरधारकांवर होणार आहे. देशातील विविध क्षेत्रातील नोकरीधारकांना पीएफ हा एक मोठा आधार असतो. कारण, त्यावर मिळणारे व्याज अधिक असते. या गुंतवणुकीवर उत्पन्न करातसुद्धा सवलत मिळते.
परंतु, केंद्र सरकार पुढील काही दिवसांत पीएफ व्याजदरात कपात करू शकते. 2021-22 मध्ये ईपीएफओजवळ सुमारे 449.34 कोटी रुपयांची अतिरिक्त रक्कम जमा राहण्याचा अंदाज होता. मात्र, उलट यात 197.72 कोटी रुपयांचे नुकसान झाले. यानंतर व्याजदराच्या आकड्यावर नव्याने विचार करण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु, या मुद्यावर अद्याप कोणताही निर्णय घेतला असल्याची अधिकृत माहिती समोर आली नाही. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने 2022-23 या आर्थिक वर्षासाठी पीएफ व्याजदर 8.15 टक्के निश्चित केला आहे. ईपीएफओला झालेले नुकसान पाहता व्याजदरावर पुनर्विचार गरजेचा आहे. व्याजदर कमी करणे आणि बाजार दरांना समपातळीत आणण्याची गरज असल्याचे म्हटले आहे.
व्याजदराचा उतरता आलेख
आर्थिक वर्ष व्याजदर टक्के
2015-16 8.80
2018-19 8.55
2019-20 8.50
2020-21 8.50
2021-22 8.10
2022-23 8.15