( रत्नागिरी / प्रतिनिधी )
मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्यासाठी रुंदीकरण करण्यात आलेल्या भागात चौपदरीकरणातील कंत्राटदाराने अद्यापही डांबरीकरण व गटारे बांधकाम पूर्ण केलेले नसल्याने पावसाळ्यामध्ये येथे सर्वत्र चिखल साठून वाहने घसरत आहेत. जुन्या रस्त्यावर दगड, माती, चिखल येऊन वाहनांचे अपघात होत आहेत. दुकाने, घरे यामध्येही पाणी शिरण्याचा धोका उदभवणार आहे. तसेच गेल्या काही महिन्यांपूर्वी येथे दोन ठिकाणी केलेले कच्चे वळण रस्तेही सध्या खड्डेमय झालेले असून ते आणखी धोकादायक होऊन अपघात घडण्याची शक्यता असल्याने येथील सेवा रस्त्यांचे खडीकरण तातडीने करण्याची गरज आहे.
पाली बाजारपेठेमध्ये महामार्ग चौपदरीकरणासाठी यावर्षी जुलै महिन्यापासून सपाटी करण करून त्यावर माती टाकली आहे. रस्त्याच्या एका बाजूला खणून सखल भागामध्ये सेवा रस्त्याचे जर्मन तंत्रज्ञान वापरून काम केले आहे. यामध्ये रस्त्याच्या बाजू पट्टयाही व्यवस्थित नसल्याने माती दगडावरुन चालताना त्रास होत आहे. त्यामुळे तेथे पावसाळयात पाणी साठून अपघात घडण्याची शक्यता आहे. त्याच बरोबर महामार्गाच्या उत्तरेकडील भागामधील सेवा रस्त्यांचे भरावावरुन उतरतानाही धोकादायक झाले आहे. यामध्ये पाली पोलीस ठाण्यात येणारा मार्ग, बँक ऑफ महाराष्ट्र, दवाखाना याकडे येणाऱ्या रस्त्यावर तर मोठा चिखल झाला असल्याने चालताही येणे अवघड झाले आहे त्यामुळे तेथे डांबर तुकडे टाकण्याची गरजेचे आहे. तेथेही व्यवस्थित रस्ता करण्याची गरज आहे.
पालीतील उर्वरीत भागामध्ये रस्त्या बाजुलगतची घरे, दुकाने सखल भागात असल्याने तेथे मातीचा चिखल घरांमध्ये घुसण्याची शक्यता असल्याने त्याठिकाणी गटारांची बांधकामे तातडीने करण्याची गरज आहे. त्यातच ही गटारे रस्त्याचे उंचीच्यावर दोन फुट असल्याने ग्रामस्थांना इंडसइंड बँकेत जाता येत नाही आहे त्यामूळे तेथे भराव टाकण्याची गरज आहे. तसेच गतवर्षी उड्डान पुलाच्या तीन खाबांचे काम अपूर्ण ठेवून कच्चा फक्त खडीकरण करुन सेवा रस्ता केलेला आहे तो ही आता खड्डेमय झाल्याने तेथेही डांबरीकरण किंवा काँक्रीटीकरण रस्ता करण्याची गरज आहे शिवाय या ठिकाणी मोठे पत्र्याचे ब्यारीकेड व लोखंडी सळ्या ठेवण्यात आल्याने तेथे पादचारी व दुचाकीस्वारांना जीव मुठीत घेऊन चालावे लागत आहे. पाली बाजारपेठेमध्ये चौपदरीकरणाच्या सपाटीकरणातील अर्धवट सेवा रस्त्यांचे व गटाराच्या अपूर्ण कामांमुळे पावसाळयात मातीचा चिखल होऊन घरांमध्ये घुसून व महामार्गावर माती येऊन अपघात घडण्याची शक्यता असल्याने त्यापूर्वी राष्ट्रीय महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरीत लक्ष देऊन कामे पूर्ण करून घेण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.