(मुंबई)
कोट्यवधी रुपयांचे बजेट असणार्या मुंबई महानगरपालिकेवर सत्ता स्थापन करण्यासाठी उद्धव ठाकरे आणि भाजपामध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. या संघर्षाची झलक आज पाहायला मिळणार आहे. राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने पालिकेच्या ठेवींमधून हजारो कोटी रुपयांचा गैरव्यवहार केला म्हणत ठाकरे गटाचा भव्य मोर्चा आज पालिकेवर धडकणार आहे तर उद्धव ठाकरेंनी 25 वर्षे पालिकेची लूट केली म्हणत या मोर्चाला उत्तर देण्यासाठी भाजपाही आजच रस्त्यावर उतरणार आहे. दोन्ही मोर्चे दुपारी 4 वाजताच निघणार आहेत. या मोर्चांमुळे मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापणार आहे.
ठाकरे गटाचा मोर्चा आज दुपारी चार वाजता मेट्रो सिनेमा मरीन लाईन्सपासून मुंबई महापालिका मुख्यालयाच्या दिशेने निघणार आहे. या मोर्चाचे नेतृत्व ठाकरे गटाचे आमदार युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे करतील. मुंबईतील ठाकरे गटाचे सर्व आमदार, खासदार, विभाग प्रमुख, विधानसभा समन्वयक, शाखाप्रमुख ,गट प्रमुख आणि शिवसैनिक या मोर्चासाठी रस्त्यावर उतरणार आहेत. मुंबईतील सर्वसामान्य जनतेला सुद्धा या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन ठाकरे गटाकडून करण्यात आले आहे. या मोर्चानंतर कोणत्याही प्रकारचे निवेदन ठाकरे गट देणार नाही. मुंबई महापालिका मुख्यालयासमोर स्टेज उभारून मुंबई महापालिका प्रशासनाच्या भ्रष्टाचारी कारभाराविरोधात ठाकरे गटाचे नेते भाषण करणार आहेत. मुंबईत वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून सर्व कार्यकर्त्यांना, पदाधिकार्यांना खाजगी वाहने घेऊन न येता लोकलने प्रवास करत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल आणि चर्चगेट येथे पोहोचण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
‘मुंबई महापालिकेकडे एकेकाळी साडेसहाशे कोटी ठेवी होत्या. शिवसेनेकडे कार्यभार आल्यानंतर या ठेवी जवळपास 92 हजार कोटीपर्यंत पोहोचल्या. या ठेवींमधून कोस्टल रोडसह जनतेच्या उपयोगाची कामे महापालिका पार पाडत होती. आता मात्र कोणत्याही कामांसाठी महापालिकेच्या पैशांचा वापर सुरू आहे. मुंबई महापालिकेत प्रशासक जरी कारभार पाहत असले तरी याच प्रशासकाद्वारे राज्य सरकारकडून विविध कंत्राटे देताना मोठा भ्रष्टाचार होत आहे,’ असा ठाकरे गटाचा आरोप आहे. मुंबई महापालिकेतल्या हजारो कोटींच्या ठेवींवर राज्य सरकारचा डोळा असून मुंबईची वाट लावण्याचे काम केले जात असल्याचे ठाकरे गटाचे म्हणणे आहे. मुंबई महापालिकेमध्ये सहा हजार कोटींचा रस्ते घोटाळा, 263 कोटींचा स्ट्रीट फर्निचर घोटाळा, खडी घोटाळा, सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन घोटाळा, रोषणाई, वाढते वीज बिल या सगळ्या भ्रष्टाचाराला वाचा फोडण्यासाठी हा मोर्चा काढला जात आहे, असे ठाकरे गटाने जाहीर केले आहे.
ठाकरे गटाच्या मोर्चाला भाजप आणि शिंदे गट प्रत्युत्तर देणार आहेत. ‘चोर मचाये शोर’ या घोषणाबाजीसह भाजपा नेते रस्त्यावर उतरणार आहेत. भाजप-शिवसेना आणि आरपीआय महायुती ठाकरे गटाच्या मोर्चाला प्रत्युत्तर म्हणून मोर्चा काढणार आहे. ठाकरे गटाच्या मोर्चावेळीच उद्या दुपारी चार वाजता महायुतीच्या वतीने नरिमन पॉईंट येथील भाजप प्रदेश कार्यालय येथे हा मोर्चा काढला जाणार आहे. ठाकरे गटाविरोधात शिंदे गट आणि भाजप रस्त्यावर उतरून शक्तिप्रदर्शन करणार आहे. दुसरीकडे भाजपा महिला मोर्चा आणि महायुती घटक पक्षांतर्फे स्वामीनारायण मंदिर येथे जनआक्रोश आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी दिली.
ते म्हणाले की, ’ठाकरे गटाने 25 वर्षांत महापालिकेच्या तिजोरीवर दरोडा घालून अक्षरश: लूट केली. तीन लाख कोटींचा हिशेब तुम्ही द्या. कोरोना काळात 12 हजार कोटींचा घोटाळा झाला. त्याचा आम्ही मुंबईकरांतर्फे हिशेब मागत आहोत. ईडी आणि एसआयटीपासून लक्ष विचलित करण्यासाठी हा मोर्चा आहे.’
मुंबईत गेले चार दिवस पावसाचा जोर वाढला आहे. उद्याही पावसाचा इशारा आहे. मात्र कितीही पाऊस असला तरी मोर्चा यशस्वी करण्याचा निर्धार ठाकरे गटाने केला आहे आणि ठाकरेंच्या मोर्चाला जोरदार प्रत्युत्तर देण्याचा भाजपा-शिंदे गटाचा निर्धार आहे. त्यामुळे शिंदे-भाजपा आणि ठाकरे गटातील ही ‘टशन’ आज रस्त्यावर दिसणार आहे.