(मुंबई)
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) व्यवस्थापकीय संचालकांचा मुलगा आणि पालघर भाजप युवा मोर्चाचा अध्यक्ष अश्वजीत गायकवाड याने मित्रांच्या मदतीने प्रेयसीला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. अश्वजीतने प्रेयसीला रात्री तीन वाजण्याच्या सुमारास भेटायला बोलावले. यावेळी त्याने प्रेयसीच्या हाताला चावा घेतानाच शिवीगाळ आणि मारहाण केली. त्यानंतर प्रेयसीला धक्का दिल्याने ती कार खाली सापडून गंभीर जखमी झाली आहे. ही घटना सोमवारी (ता.11) मध्यरात्री ३ वाजण्याच्या सुमारास घडली असे सांगितले जाते. अश्वजीत गायकवाड हा विवाहित असल्याचे समोर आल्यानंतर त्या युवतीने जाब विचारला. त्यावेळी त्याने हे कृत्य केल्याचे समोर आले. सदर युवती गंभीर जखमी असून, या घटनेची दखल घेत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी जिल्हा दंडाधिकारी आणि जिल्हा पोलिस अधीक्षकांकडून अहवाल मागविला आहे.
अश्वजीत गायकवाड या ३४ वर्षीय तरुणाने त्याच्या प्रेयसीला कारखाली चिरडून तिची हत्या करण्याचा प्रयत्न केला. अश्वजीतने आपण विवाहित आहोत, हे सत्य प्रेयसीपासून लपवून ठेवले. मात्र, यासंबंधीचे बिंग फुटताच तिने अश्वजीतला अनेकदा कॉल केला. मात्र, तो फोन घेत नव्हता. त्यानंतर फोन उचलताच तिला घोडबंदर रोडवरील ओवळा भागातील कोर्टयार्ड हॉटेलजवळ बोलावले. तिथे पोहोचताच त्यांच्यात भांडण झाले आणि रागाच्या भरात अश्वजीतने त्याचा चालक सागरला प्रेयसीच्या अंगावर गाडी घालायला सांगितले. त्यानंतर चालकाने रेंज रोव्हर डिफेन्डर गाडी तिच्या अंगावर घातली आणि तिला जखमी अवस्थेत सोडून आरोपी पळून गेल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, अर्ध्या तासाने रस्त्यावरून जाणा-या एकाने तिला पाहिले आणि पोलिसांना बोलावून घेतले आणि त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. यासंबंधी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनीही ट्विट करून माहिती दिली आहे.
अश्वजीतच्या मित्राकडून रुग्णालयात जाऊन धमक्या
धक्कादायक बाब म्हणजे आरोपी अश्वजीतचे काही मित्र रुग्णालयात जाऊन जखमी तरुणीला धमक्या देत असल्याचे समोर आले. यासंबंधी या तरुणीने सोशल मीडियावर पोस्ट करून आपल्यावर ओढवलेल्या परिस्थितीला वाचा फोडली.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांचा मुलगा अश्वजीत गायकवाडने मित्रांच्या मदतीने प्रेयसीला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना माध्यमातून समोर आली. पीडित तरुणी जखमी असून मानसिक तणावाखाली आहे, असे सांगत यासंबंधी पालघरचे जिल्हा दंडाधिकारी आणि पोलिस आयुक्तांकडून तातडीने अहवाल मागविल्याचे रुपाली चाकणकर यांनी सांगितले.