(पाचल / तुषार पाचलकर)
प्राथमिक आरोग्य केंद्र फुपेरे अंतर्गत असलेले तुळसवडे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र हे १९८१ पासून मंजूर होते. परंतु त्या करिता जागा न मिळाल्याने हे उपकेंद्र होऊ शकले नव्हते. जागे करिता शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या माध्यमातून त्यांचे स्वीय सहाय्यक आदिनाथ कपाळे यांनी शासनाची जागा पाठपुरावा उपकेंद्रासाठी मिळवून दिली तसेच त्यासाठी लागणारा ३० लाखाचा निधी देखील सदाभाऊ खोत यांच्या माध्यमातून जिल्हा नियोजन अंतर्गत मंजूर करून करून घेतला. जवळपास ४३ वर्षानंतर तुळसवडे गावामध्ये आरोग्याची दारे आज दिनांक ५ जून २०२३ रोजी खुलं झाली. या आरोग्य उपकेंद्रामध्ये तुळसवडे सोलिवडे, जांभवली, आडवली या गावांचा समावेश होतो.
आज दिनांक ५ जून २०२३ रोजी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या शुभहस्ते आणि राज्याचे माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या प्रमुख उपस्थितीत प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचा लोकार्पण सोहळा पार पडला.
आजच्या लोकार्पण सोहळ्यानंतर हे प्राथमिक आरोग्य वर्धीनी उपकेंद्र सर्व सुविधांनी पूर्ण असून ते आजपासून सर्वांच्या सेवेसाठी उपलब्ध झाले आहे. त्यामुळे पंचक्रोशीतील सर्वच ग्रामस्थांमध्ये एक आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
तुळसवडे गावाला पालकमंत्री उदय सामंत यांनी डी.पी.डी.सी. अंतर्गत निधी दिल्याबद्दल आणि माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आतापर्यंत विविध योजनेअंतर्गत तुळसवडे गावाला जवळजवळ २ ते २.५० कोटी एवढा निधी दिल्याबद्दल गावाकडून त्यांचे विशेष आभार मानण्यात आले. तसेच ही विकासकामे आपल्या गावाकडे खेचून आणण्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल गावचे सुपुत्र आदिनाथ कपाळे यांचा आपल्या भाषणामध्ये विशेष उल्लेख करत पालकमंत्री उदय सामंत आणि माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आदिनाथ कपाळे आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे यांचे अभिनंदन देखील केले.
या कार्यक्रमामध्ये जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री कीर्ती किरण पुजार, जिल्हा आरोग्य अधिकारी श्री अनिरुद्ध आठल्ये, राजापूरचे गटविकास अधिकारी श्री. विवेक गुंड, प्रांत अधिकारी वैशाली माने, तसेच आरोग्य विभागाचे सर्व अधिकारी, पोलिस अधिकारी, गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने गावामध्ये संध्याकाळी बुवा श्री संतोष आरावकर आणि बुवा श्री संदीप नाईकधुरे यांचा डबलबारी भाजनाचा जंगी सामना देखील आयोजित करण्यात आला आहे.