(पाचल /तुषार पाचलकर)
राजापूर तालुक्यातील पाचल गावचे ग्रामस्थ प्रदीप नारायण जाधव यांच्या मालकीच्या दुभती म्हैसीचा आज विजेच्या तारेला शॉक लागून जागीच मृत्यू झाला आहे. सदरची घटना आज 27 जून रोजी सकाळी 10 वाजता येथील पाचलचे ग्रामदैवत श्री देव केदारलिंग मंदिराच्या परिसरात घडली असून या घटनेची तात्काळ दखल घेतं पाचल मंडळ अधिकारी गजानन राईन, तलाठी सचिन पाटील, कोतवाल अमित चिले, पोलीस प्रशासनाकडून रायपाटण पोलीस दूरक्षेत्रचे हेड कॉन्स्टेबल कमलाकर पाटील, पोलीस कॉन्स्टेबल निलेश कात्रे, महावितरण कंपनीचे अधिकारी अमित कोळी, स्वप्नील कडू तसेच पशुधन विकास अधिकारी पंचायत समिती राजापूरचे डॉ.प्रभात किंद्रे,डॉ.आर वाय चंदूरकर, डॉ प्रभाकर माने यांनी घटना स्थळी पोचून पंचनामा केला व सदर घटनेबाबतचा रिपोर्ट वरिष्ठांना कळविण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
पावसाळा सुरु झाल्यापासून महावितरणाच्या वीजपूरवठाबाबतीत अनेक प्रश्न पाचल व परिसरात उपस्थित केले जातं आहे. अनेक ठिकाणी झाडं पडून वीजेच्या तारा तुटत आहेत व अनेक तास विजपूरवठा खंडित होतं आहे, तर कधी शॉर्ट सर्किटमुळे नुकसान होतं आहे.
सदरची घटना जरी सकाळी घडली असली तरी ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या ठिकाणी कित्येक दिवसापासून विजेची तार जमिनीवर पडून होती व त्यातून वीजप्रवाह चालू होता, असे समजते. पावसाचे दिवस असल्याने पडलेल्या तारेभोवती पाणी साचले होते अश्या वेळी जर कोणी मनुष्यप्राणी त्या ठिकाणी गेला असता तर नक्कीच जीवीतहानी झाली असती असं आता बोललं जात आहे.