क्रिकेट वर्ल्डकपचा १८ वा सामना सामना आज पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला गेला. बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा ६२ धावांनी पराभव केला. सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकात ३६७ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानचा डाव ४५.३ षटकात ३०५ धावांवर गारद झाला.
बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाने 50 षटकांत नऊ गडी गमावून 367 धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानला 45.3 षटकात केवळ 305 धावा करता आल्या आणि सामना गमवावा लागला.
ऑस्ट्रेलियाकडून दोन्ही सलामीवीर फलंदाजांनी शतके झळकावली. डेव्हिड वॉर्नरने 163 आणि मिचेल मार्शने 121 धावा केल्या. मार्शने 108 चेंडूत 121 धावा केल्या. यादरम्यान त्याने 10 चौकार आणि 9 षटकार मारले. वाॅर्नर 124 चेंडूत 163 धावा करून बाद झाला. त्याने 14 चौकार आणि नऊ षटकार मारले. या दोघांशिवाय अन्य कोणत्याही फलंदाजाला 25 धावांचा पल्ला गाठता आला नाही.
पाकिस्तानकडून शाहीन आफ्रिदीने 10 षटकात 54 धावा देताना सर्वाधिक 5 बळी घेतले. आफ्रिदीने मिचेल मार्श,ग्लेन मॅक्सवेल,मार्कस स्टॉइनिस, मिचेल स्टार्क आणि जोश हेझलवूड यांना बाद केलं. हरिस रौफने तीन गडी बाद केले मात्र त्याने 8 षटकात 83 धावा दिल्या. उसामा मीरनेही एक विकेट घेतली मात्र त्याने 9 षटकात 82 धावा दिल्या.
🏏 Match Summary 🏏
Pakistan fall short by 62 runs in Bengaluru.We take on Afghanistan next on Monday.#AUSvPAK | #DattKePakistani pic.twitter.com/v4Cnre6y1E
— Pakistan Cricket (@TheRealPCB) October 20, 2023
या शानदार विजयासह ऑस्ट्रेलियन संघाने वर्ल्डकपमध्ये दमदार पुनरागमन केले आणि गुणतालिकेत टॉप ४ संघांमध्ये एन्ट्री केली आहे. तर पराभूत झालेल्या पाकिस्तानची पाचव्या क्रमांकावर घसरण झाली आहे. ऑस्ट्रेलियाचा हा या वर्ल्डकपमधील दुसरा विजय आहे. तर पाकिस्तानचा दुसरा पराभव आहे. दोन्ही संघांनी आतापर्यंत प्रत्येकी ४ सामने खेळले आहेत. ऑस्ट्रेलियाला भारत आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले होते. मात्र, यानंतर ऑस्ट्रेलियन संघाने दमगार पुनरागमन करत पुढील दोन सामने जिंकले. यापूर्वी झालेल्या सामन्यात कांगारू संघाने श्रीलंकेचा पराभव केला होता.
तर पाकिस्तानने आपले पहिले दोन सामने जिंकल्यानंतर त्यांचा भारत आणि आज ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभव झाला.
गुणतालिकेत टॉप ४ मध्ये कोण-कोण?
वर्ल्डकपच्या पॉइंट टेबलमध्ये न्यूझीलंड पहिल्या स्थानावर आहे. त्यांनी त्यांचे चारही सामने जिंकले आहेत. न्यूझीलंड ८ गुणांसह आणि +१.९२३ नेट रनरेटसह पहिल्या स्थानावर आहे. तर दुसऱ्या स्थानावर भारत आहे. भारताचे ४ सामन्यात ८ गुण आहेत. त्यांचा नेट रनरेट +१.६५९ इतका आहे. तिसऱ्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिका आहे. त्यांचे ३ सामन्यात दोन विजयांसह ४ गुण आहेत. तर आफ्रिकेचा नेट रनरेट +१.३८५ इतका आहे. यानंतर ऑस्ट्रेलिया ४ पैकी २ विजयांसह ४ गुण आणि -०.१९३ नेट रनरेटसह चौथ्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलियाचा नेट रनरेट निगेटीव्ह आहे, तो त्यांना सुधारावा लागेल. यानंतर पाकिस्तान पाचव्या स्थानावर घसरला आहे. त्यांचे ४ सामन्यात २ विजयांसह ४ गुण आहेत. पाकिस्तानचा नेट रनरेट निगेटीव्ह झाला आगे. -०.४५६ असा त्यांचा नेट रनरेट आहे. पाकिस्तानच्या खाली अनुक्रमे इंग्लंड, बांगलादेश, नेदरलँड्स अफगाणिस्तान आणि श्रीलंकेचा नंबर लागतो.