( रत्नागिरी )
राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचा तीन दिवसांचा दौरा हा कोणताही संघर्ष करण्यासाठी अथवा ताकद दाखविण्यासाठी नव्हता. हा दौरा केवळ विकासात्मक कामासाठी, पर्यटनाला चालना देण्यासाठी होता. त्यानुसार रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यातील पर्यटन विकासासाठी महाविकास आघाडी सरकारने ११६ कोटींचा निधी मंजूर केला आहे, अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले की, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यात तिन्ही जिल्ह्यातील पर्यटन तसेच विकासात्मक कामांना गती देण्याचा प्रयत्न राहिला. यातूनच तीन जिल्ह्यातील पर्यटन विकासासाठी सरकारने ११६ कोटींचा निधी मंजूर केला आहे. यात रत्नागिरीसाठी २५ कोटी ८१ लाख, सिंधुदुर्गसाठी २३ कोटी १३ लाख तर रायगडसाठी ६० कोटी निधी देण्यात आला आहे.
या निधीतून संगमेश्वर-कसबा येथील छत्रपती संभाजी महाराज स्मारकासाठी ५ कोटी, रत्नागिरीतील म्युझिकल गार्डनसाठी ५ कोटी, तारांगणातील सायन्स गॅलरीसाठी १ कोटी ६३ लाख, हातीस येथील पिरबाबा दर्गा परिसर विकासासाठी १ कोटी निधी देण्यात आला असल्याचे सामंत यांनी सांगितले. याशिवाय जिल्ह्यातील अन्य पर्यटन स्थळे विकासासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. निधी मंजुरीमुळे जिल्ह्यातील पर्यटन विकासाला चालना मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.