(रत्नागिरी/प्रतिनिधी)
परदेशात आपल्याला 6 रात्री व 7 दिवसांपर्यंत राहण्याची संधी प्राप्त झाली आहे. त्यासाठी आपल्याला लाख रुपये भरावे लागतील अशा प्रकारची बतावणी करून रत्नागिरीतील जोडप्याची फसवणूक करणाऱ्या दोन महिलांना रत्नागिरी शहर पोलिसांनी अटक केली आहे. हसीना महम्मद युसुफ शेख (22, घाटकोपर वेस्ट), काजल चंद्रमण विश्वकर्मा (23, नागपूर) अशी अटक करण्यात आलेल्या दोन महिलांची नावे आहेत़. शुक्रवार 8 जुलै रोजी न्यायालयापुढे हजर केले असता दोघींना 13 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मात्र यातील मुख्य आरोपी अद्याप फरार आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरी शिवाजीनगर येथील डी़. एस. चंद्रशेखर यांनी शहर पोलीस स्थानकात याबाबतची तक्रार दाखल केली होती़. चंद्रशेखर यांना 26 मे 2022 रोजी एका मोबाईलवरून कॉल आला़. यामध्ये तुम्हाला लकी कपल म्हणून निवडण्यात आले आहे़, तरी आपण भाट्ये येथील कोहिनूर बीच रिसॉर्ट येथे 28 मे 2022 रोजी वॉस्कॉन रिअर इस्टेट अॅण्ड ट्रॅव्हल मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड यांच्यावतीने होणार्या सेमिनारमध्ये सहभागी व्हा, असे सांगण्यात आले़. त्यानुसार चंद्रशेखर यांनी सेमिनारमध्ये सहभाग घेतला.
यावेळी प्रशांत नावाच्या मुख्य संशयित आरोपीने देशात व देशाबाहेर फिरण्याच्या ठिकाणांची माहिती दिली. त्यामध्ये परदेशात 6 रात्री व 7 दिवसांच्या स्कीमबाबत त्यांना सांगितले. मात्र या स्कीमचा लाभ घेण्यासाठी 1 लाखांची मेंबरशिप घ्यावी लागेल असेही त्यांना सांगण्यात आले. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून चंद्रशेखर यांनी 1 लाख रूपयांचा भरणा करून मेंबरशीप घेतली. दरम्यान या स्कीमचा फायदा घेण्यासाठी चंद्रशेखर यांनी फोन केला असता संपर्क होवू शकला नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच चंद्रशेखर त्यांनी शहर पोलिसांत तक्रार दाखल केली होती़. त्यानुसार पोलिसांनी चौकशी सुरू केली होती. या प्रकरणात मुंबई येथून महिलांना ताब्यात घेण्यात आले.