(संगमेश्वर)
संगमेश्वर तालुक्यात आज शनिवारी दुपारी अचानक ढगांच्या गडगडाटात पावसाने जोरदार बॅटिंग केली. शहरामध्ये तासभरात तुफान पाऊस बरसत असल्याचे पाहायला मिळाले. हा पाऊस सुरुवातीला होणारा आहे की परतीचा अशी आता चर्चा रंगू लागली आहे.
मागील दोन चार दिवस सकाळपासून आकाश स्वच्छ असते. दुपार झाल्यानंतर अचानक ढगांच्या गडगडाट पावसाला सुरुवात होते. अशाच पद्धतीचा आज देखील जिल्ह्यात ठिकठिकाणी तासभर बरसलेल्या पावसाने ढगांचा गडगडाटात जोरदार बॅटिंग केली. अचानक आलेल्या पावसामुळे सर्वांची धांदल उडाली होती. या पाऊसांमुळे भातशेतीचे अतोनात नुकसान होण्याच्या चिंता शेतकऱ्यांना लागली आहे. या पडलेल्या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. तर दुसरीकडे अजून पावसाने काळोख केल्याने जोरदार पाऊस होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
भातशेतीचे नुकसान होण्याची शक्यता
गेले काही दिवस परतीच्या पावसाने संगमेश्वर तालुक्यात जोरदार बरसायला सुरवात केली असल्याने हळव्या भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. यावर्षी पाऊस चांगला झाल्याने हळवी शेती वेळीच कापणीला आली आहे. गणपती उत्सव संपल्यावर शेतकरी हळव्या शेतातातील पीक खळ्यात घेण्याच्या तयारीत असतानाच परतीच्या पावसाने धुमाकूळ घालायला सुरुवात केल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे होणारे शेतीचे नुकसान शेतकऱ्याच्या जिव्हारी लागत आहे. मात्र दिवसेदिवस असाच जोरदार पाऊस होत राहिला तर भात, नाचणी या पिकाचे नुकसान होणार आहे.