(संगमेश्वर)
महाराष्ट्राला रंगभूमीची परंपरा ही शतकानुशतके आहे. शहराप्रमाणेच गावागावांतही ही परंपरा जोपासली जाते. संगमेश्वर तालुक्यातील परचुरी वेल्येवाडी येथे गेली ४७ वर्षे नवनिर्माण नाट्यमंडळ ही परंपरा जपत आहे. यंदाच्या वर्षी हे मंडळ राम गणेश गडकरी यांचे राजीयांचे राजे हे नाटक सादर करणार आहे.
नवनिर्माण नाट्यमंडळ दरवर्षी महाशिवरात्रीनंतर दर्श अमावास्येच्या दिवशी (१० मार्च) वाडीच्या सार्वजनिक पूजेला हे ऐतिहासिक नाटक सादर करण्याची परंपरा १९७६ पासून सुरू झाली.प्रारंभीची दहा वर्षे काल्पनिक नाटके सादर केल्यावर १९८५ ला पहिलें ऐतिहासिक नाटकं मंडळाने सादर केले. छत्रपती शिवाजी महाराजांवरील महाराष्ट्राचा बहुरुपी हे नाटक त्या वर्षी सादर झाले.तेव्हापासून हे मंडळ ऐतिहासिक नाटकं सादर करत आलें आहे.
या मंडळाची आणखी एक परंपरा म्हणजे नाटकाच्या तालिमींचा शुभारंभ हा देवदिवाळीला होतो. देवदिवाळीच्या दिवशी मंडळाचे कलाकार एकत्र जमून नाटकाच्या संहितेचे पूजन करून नारळ वाढवतात आणि नाटकाचे प्रथम वाचन केले जाते.आजतागायत ही परंपरा जपली गेली आहे.देवदिवाळीला आगामी नाटकाचा शुभारंभ करण्यात आला. यावर्षी राम गणेश गडकरी लिखित राजीयांचे राजे हे नाटक मंडळाचे कलाकार सादरीकरण करणार आहेत. नाटकाचे दिग्दर्शन काशिनाथ वेल्ये करत आहेत.