(मुंबई)
भगतसिंह कोश्यारी यांना महाराष्ट्राच्या राज्यपालपदावरून दूर करावे, या मागणीसाठी काही दिवसांपूर्वी राज्यभरात विरोधकांनी रान उठवले होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह महापुरुषांची बदनामी केल्याप्रकरणी विरोधकांनी राज्यपालांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. राज्यपालांविरोधात राज्याच्या विविध भागात आंदोलने करण्यात आली होती. त्यातच आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली. या संदर्भात राजभवनाने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकातून राज्यपाल कोश्यारी यांनी ही माहिती दिली. कोश्यारी यांनी सप्टेंबर २०१९ मध्ये महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून पदभार स्वीकारला होता.
महाराष्ट्रासारख्या संत, समाजसुधारक आणि शूरवीरांच्या महान भूमीचा राज्यसेवक, राज्यपाल होण्याचा बहुमान मिळणे हे माझ्याकरिता अहोभाग्य होते. गेल्या ३ वर्षांहून अधिक काळ राज्यातील जनसामान्यांकडून मिळालेले प्रेम आणि आपुलकी कधीही विसरता येणार नाही. माननीय पंतप्रधानांच्या नुकत्याच झालेल्या मुंबई दौ-यात आपण राजकीय जबाबदा-यामधून मुक्त होऊन जीवनातील उर्वरित काळ अध्ययन, मनन व चिंतनात व्यतीत करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. माननीय पंतप्रधानांचा विशेष स्नेह आपणास नेहमीच लाभत आला आहे आणि आशा आहे की या संदर्भात मला त्यांचा आशीर्वाद मिळत राहिल, असे राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या मनोगतात म्हटले आहे.
अमित शाहांनाही पत्र
१२ डिसेंबर २०२२ रोजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहिले होते. या पत्रात त्यांनी संपूर्ण वादावर आपली भूमिका व्यक्त केली होती. महापुरुषांचा अपमान करण्याची आपला कोणताही उद्देश नव्हता. गृहमंत्र्यांनी या संदर्भात मार्गदर्शन करण्याची विनंती त्यांनी केली होती.