(मुंबई)
पत्राचाळ घोटाळा प्रकरणात शिवसेना नेते संजय राऊत यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. त्यानंतर त्यांच्या न्यायालयीन कोठडीतही वाढ करण्यात आली आहे. मात्र आता या प्रकरणात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची चौकशी करा अशी मागणी झाल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
भाजपचे आमदार अतुल भातखळकर आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या काही आरोपांमुळे या संपुर्ण प्रकरणाला वेगळं वळण आले आहे. 2006-07 साली पत्राचाळ प्रकरणी झालेल्या बैठकीत म्हाडाचे काही अधिकारी तसेच तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि केंद्रिय कृषीमंत्री शरद पवारसुद्धा उपस्थित होते, असं स्पष्टपणे ईडीने आपल्या आरोप पत्रात नमुद केलं आहे.
यामुळे मराठी माणसाला बेघर करणाऱ्या पत्राचाळ घोटाळा प्रकरणी प्रसिद्धीपत्रक जारी करत शरद पवारांचीही चौकशी करा, अशी मागणी अतुल भातखळकर यांना केली आहे. त्यामुळे आता पत्राचाळ घोटाळा प्रकरण नेमकं कोणते वळण घेणार याची सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे.