(कोल्हापूर)
पत्नीसह दोन मुलांना पाण्यात ढकलून पतीने गळफास घेत आत्महत्या केल्याची अंगाचा थरकाप उडवणारी घटना कोल्हापुरातील कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत घडली आहे. दरम्यान पाण्यात ढकललेल्या दोन मुलांपैकी मुलीला वाचवण्यात यश आले आहे. या प्रकरणी पती विरोधात खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सुदैवाने यामध्ये बचावलेल्या मुलीवर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तिला पोहता येत असल्याने तिचा जीव वाचला आहे. स्थानिकांनी तिला आधार दिला. कालव्यात ढकलून दिल्याने राजश्री संदीप पाटील (वय 32) व सन्मित संदीप पाटील (वय 8 दोघेही रा. हलसवडे, ता. करवीर) यांचा बुडून मृत्यू झाला. मुलगी श्रेया (14) हिच्यावर ‘सीपीआर’मध्ये उपचार सुरू आहेत. जखमी अवस्थेत असलेल्या मुलीने माहिती दिली. मात्र, ती भेदरलेली असल्याने तिच्याकडून पोलिस सविस्तर माहिती घेत आहेत. आईसह मला आणि माझ्या भावाला वडिलांनी कालव्यात ढकलून दिल्याचा जबाब मुलीने सीपीआरमध्ये उपचार घेत असताना दिला.
कोल्हापुरातील करवीर तालुक्यातील हसवडे ग्रामपंचायतच्या मागे राहणारे संदीप अण्णासो पाटील (वय वर्ष ३६) हे पत्नी, मुलगा व मुलगी अशा परिवारासह राहत होते. संदीप यांचा साऊंड सिस्टीमचा व्यवसाय होता.
पतीची गळफास घेऊन आत्महत्या
दुसऱ्या बाजूला संशयित आरोपी संदीप पाटील याचा पोलिसांनी शोध सुरू केला. संदीप पाटील याने कर्नाटकातील भोज येथील एका रस्त्यावर आपली दुचाकी पार्क करून शेतात जाऊन गळफास घेतला असल्याची माहिती मिळाली. या घटनेची माहिती सदलगा पोलिसांना देण्यात आली. यावेळी चिकोडीचे डीएसपी बसवराज यलीगार यांच्यासह पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक सहाय्यक उपनिरीक्षक यांनी घटनास्थळी धाव घेत संदीप पाटील याचा मृतदेह ताब्यात घेतला.