(रत्नागिरी)
शहरातील पटवर्धन हायस्कूल प्रशालेतील विद्यार्थ्यांनी कचऱ्याच्या समस्येवर आधारित पथनाट्य सादर केले. त्यांचा या वेगळ्या जनजागृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे. 23 मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता शहरातील मारुती मंदिर चौकात प्रशालेतील विद्यार्थ्यांनी नागरिकांमध्ये कचऱ्याच्या समस्येबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी या पथनाट्याचे सादरीकरण केले. त्यापूर्वी पथनाट्याचे सादरीकरण सर्वप्रथम प्रशालेच्या प्रांगणात विद्यार्थ्यांसमोर करण्यात आले. त्यानंतर मारुती मंदिर येथेही सादरीकरण करण्यात आले.
या पथनाट्यास शुभेच्छा देण्यासाठी प्रशालेचे मुख्याध्यापक राजेंद्र कांबळे, पर्यवेक्षक मनोज जाधव, सत्यवान कोत्रे, आर्डेसर, भारत शिक्षण मंडळाचे कार्यवाह श्री सुनील तथा दादा वणजू, विनायक हातखंबकर , कलाशिक्षक रुपेश पंगेरकर, विदुला घाणेकर व पालक वर्ग ही उपस्थित होता. ‘स्वच्छतेतून समृद्धीकडे’ या पथनाट्याचे लेखन व दिग्दर्शन प्रशालेच्या शिक्षिका श्रद्धा राजन बोडेकर यांनी केले. ताल वाद्याची साथ श्री हरेश केळकर यांनी दिली. कार्यक्रमाचे छायाचित्रण सचिन सावंत यांनी केले.
दिवसेंदिवस कचऱ्याची समस्या उग्र स्वरूप धारण करत आहे. यासाठी कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन व वर्गीकरण कसे करावे तसेच कचऱ्याची योग्य विल्हेवाट कशी लावायची याबाबत विविध प्रसंगातून आणि गीतांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी ही समस्या सर्वांसमोर मांडली. कचरा कमी करा, प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळा, कापडी पिशव्या वापरा, विविध वस्तूंचा पुनर्वापर करा, असे संदेश देणारे आकर्षक फलक सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. हे पथनाट्य पाहण्यासाठी आलेल्या उपस्थित रत्नागिरीकरांनीही विद्यार्थ्यांचे व प्रशालेच्या उपक्रमाचे कौतुक केले
फोटो : पटवर्धन हायस्कूल रत्नागिरी येथील विद्यार्थ्यांनी मारुती मंदिर चौकामध्ये पथनाट्यातून कचऱ्याच्या समस्या बाबत जनजागृती करणारे पथनाट्य सादर केले. त्याप्रसंगी विद्यार्थ्यांसह शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र कांबळे, विनायक हातखंबकर ,शिक्षिका श्रद्धा बोडेकर आणि इतर( छाया – सचिन सावंत )